रेल्वे ट्रॅक्शनच्या समस्येकडे वेधले लक्ष
By Admin | Updated: October 18, 2015 22:10 IST2015-10-18T22:09:41+5:302015-10-18T22:10:27+5:30
रेल्वे ट्रॅक्शनच्या समस्येकडे वेधले लक्ष

रेल्वे ट्रॅक्शनच्या समस्येकडे वेधले लक्ष
नाशिकरोड : एकलहरेरोड येथील रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखान्यात सर्व
सोयी-सुविधा उपलब्ध असून, कारखान्याचे लवकरात लवकर विस्तारीकरण करण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे (विद्युत) बोर्ड सदस्य नवीन टंडन यांच्याकडे केली.
नाशिक येथे आलेले रेल्वे विद्युत बोर्ड सदस्य नवीन टंडन यांची शनिवारी सकाळी खासदार हेमंत गोडसे यांनी भेट घेऊन रेल्वे ट्रॅक्शन कारखाना विस्तारीकरणाबाबत चर्चा करून निवेदन दिले. टंडन यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे कर्षण मशीन कारखान्यात सध्या ५०० च्या वर कामगार कार्यरत असून, रेल्वे विद्युत इंजिनला लागणाऱ्या मोटर्स आर्मीचरचे रिपेअरिंगचे काम कारखान्यात होत आहे. मात्र येत्या दोन-तीन वर्षांत २०० ते २५० कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने कामगार भरती करणे गरजेचे आहे. रेल्वे इंजिन कारखाना उभारताना २५० एकर जमीन भूसंपादन केली गेली आहे. त्यामुळे विद्युत रेल्वे इंजिन प्रकल्पासाठी नव्याने जमीन भूसंपादन करण्याची कुठलीही गरज नसून सर्व सोयीयुक्त कर्षण मशीन कारखान्याची जागा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत टंडन यांनी कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत जाणीवपूर्वक लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी कर्षण मशीन कारखाना मुख्य कारखाना प्रबंधक संजय वाघमारे, भारत पाटील, पी. ए. पाटील, योगेश शेळके, मनोज नागरे, सुभाष सोनवणे, एस. एस. बेंडाळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)