पांढुर्लीरोडवर चक्का जाम आंदोलन
By Admin | Updated: February 1, 2017 00:49 IST2017-02-01T00:49:25+5:302017-02-01T00:49:38+5:30
पांढुर्लीरोडवर चक्का जाम आंदोलन

पांढुर्लीरोडवर चक्का जाम आंदोलन
देवळाली कॅम्प : भगूर येथील सकल मराठा समाज, शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पांढुर्ली रोडवरील दारणा पुलावर चक्का जाम आंदोलन केले. सकल मराठा समाजाच्या वतीने भगूरमधून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हाती भगवा ध्वज घेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला, तर चौकाचौकांत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत दारणा नदी पुलावर शेकडो कार्यकर्त्यांनी शांततेत १ तास चक्का जाम आंदोलन केले. यामुळे पुलावर दुतर्फा अर्ध्या किमीपर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांना घटनेची माहिती कळताच सपोनि संपत लोंढे यांच्यासह पोलीस कर्मचारी हजर होताच शांततेत चक्का जाम आंदोलन कार्यकर्त्यांनी मागे घेत वाहतूक सुरळीत करण्यास सहकार्य केले. दरम्यान, गावोगावी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
भगूर येथे पांढुर्ली चौफुलीवर छावणी परिषदेच्या जकात समोर १२ वाजता मराठा बांधवांनी एकत्र येऊन रास्ता रोको करून चक्का जाम करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना तात्पुरते ताब्यात घेऊन वाहतूक पूर्ववत करत सोडून दिले. ज्या ठिकाणी रस्ता अडकवून आंदोलन करण्यात येण्याची शक्यता बघून पोलिसांनी सकाळपासूनच बंदोबस्त ठेवला होता. लहवित पांढुर्लीतून निवेदने भगूरपासून जवळच असलेल्या लहवित येथे सकल मराठा समाजाच्या वतीने १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव, विठ्ठल पोटे यांना निवेदन देण्यात आले. त्यात कोपर्डी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पांढुर्ली येथे ५० हून अधिक लोकांनी एकत्र येत घोटी-सिन्नर महामार्गावर १५ मिनिटे रस्त्यावर बसून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार मनोज खैरनार यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)