फुलले कमळ; ‘रुतला काटा’
By Admin | Updated: February 25, 2017 01:01 IST2017-02-25T01:01:11+5:302017-02-25T01:01:27+5:30
फुलले कमळ; ‘रुतला काटा’

फुलले कमळ; ‘रुतला काटा’
संदीप भालेराव : नाशिक
नाशिकरोड विभागातील २३ पैकी १२ जागा जिंकत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा आवाज बुलंद झाला आहे. शिवसेना उमेदवारांचा अगदी काही मतांच्या फरकाने पराभव झाल्याने भाजपाच्या कमळाचा ‘काटा’ अनेकांच्या जिव्हारी रुतला असणार. तसेही भाजपाचे हे यश अनपेक्षितच मानले जात असले तरी सेनेसह अन्य पक्षांना हे सत्य स्विकारावेच लागणार आहे.
नाशिकरोड हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मागील पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे ७, राष्ट्रवादी ३, कॉँग्रेस २, मनसे ४, भाजपा ४, रिपाइं २ आणि अपक्ष १ असे बलाबल होते. नाशिकरोडमध्ये शिवसेनेचाच प्रचाराचा बोलबाला होता, तर भाजपाकडून व्यक्तिगत पातळीवरच प्रचार होत असल्याने भाजपा बॅकफुटवर असल्याचीच चर्चा झाली होती. शिवाय नाराज भाजपा कार्यकर्र्त्यांनी तर ‘भाजपाला मते देऊ नका’ असाच प्रचार चालविला होता. त्यामुळे नाशिकरोडमध्ये शिवसेना मोठा पक्ष ठरेल असे वाटत असताना प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच ठरले. नाशिकरोड विभागातील सहा प्रभागांत भाजपाने जोरदार मुसंडी मारत २३ पैकी १२ जागांवर विजय मिळविला, तर ११ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. कॉँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं, बसपा तर चर्चेतही आले नाही. भाजपाला मोठे यश मिळाले असले तरी पाच ठिकाणी भाजपाचा विजय निसटता झाला आणि भाजपाचे कमळ फुलले. अवघ्या काही मतांच्या फरकाने भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याने त्याची सल मात्र शिवसेनेला असणार आहे. प्रभाग १८ मध्ये भाजपाचे शरद मोरे, मीरा हांडगे आणि विशाल संगमनेरे विजयी झाले असले तरी दोन ठिकाणी शिवसेना तर अन्य एका ठिकाणी अपक्ष उमेदवार अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभूत झाले. शिवसेना बंडखोर सुनील बोराडे यांना शिवसेनेचे अशोक सातभाई यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली त्यामुळे सेना आणि स्वत: सातभाई यांना हा पराभव जास्त जिव्हारी लागणारा आहे. पक्षाने बोराडे आणि सातभाई यांच्यात समेट घडविला असता तर चित्र वेगळे असते. तीच बाब अपक्ष पवन पवारच्या बाबतीत आहे. पवार अवघ्या ७१३ मतांनी पराभूत झाले. या ठिकाणी भाजपाचा निसटता विजय उमेदवाराला कायम बोचत राहणार आहे. प्रभाग २१ मध्ये भाजपाच्या कोमल मेहरोलिया आणि सरोज अहिरे या विजयी झाल्या, मात्र हा चमत्कार घडलाच कसा अशीच प्रतिक्रिया परिसरात उमटून गेली. शिवसेनेच्या तनुजा घोलप या अवघ्या ३०३ मतांनी, तर माजी महापौर राहिलेल्या नयना घोलप या देखील २३७ इतक्याच मतांनी पराभूत झाल्या. घोलप यांच्या उंबऱ्यावर येऊन त्यांच्या दोन्ही कन्यांचा केलेला पराभव घोलप कधीच विसरणार नाहीत. आता घोलप यांना मतदारांनी धडा शिकविला म्हणा की, शिवसैनिकांनीच काम केले नाही. असे काहीही विश्लेषण केले जात असले तरी बबनराव घोलपांना कमळाचे ‘काटे’ टोचत राहणार हे मात्र नक्की. देवळालीतील शिवसेनेत फारकाही अलबेल नाही हे आता उघड झाले आहे. यंदाचे बलाबल पाहाता अवघ्या एका जागेने भाजपाचे पारडे जड आहे. पण हा एक आकडाही सेनेला नेहमीच पराभवाची जाणीव करून देणारा ठरणार आहे. शिवसेनेत कधीनव्हे इतके टोकाचे मतभेद झाले आणि काही प्रभागांत त्याचा फटका सेनेच्या उमेदवारांना नक्कीच बसला. या निकालाच्या निमित्ताने आपापसात लढायचे की भाजपाशी लढाई द्यायची याचा फैसला सेनेला येत्या काळात करावा लागणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षालाही आत्मपरीक्षणाची गरज आहे. तेच ते चेहरे आणि तेच ते पदाधिकारी, त्यांच्याभोवतीच फिरणारे स्थानिक राजकारण आता त्यांना सोडून द्यावे लागेल. तरुणांची फळी, महिला विंग याकडे या दोन्ही पक्षांचे लक्षच नसल्याचे दिसते. या निकालातून पक्षाचे अस्तित्व पणाला लागलेले असतानाही जर हे दोन्ही पक्ष गाफील राहणार असतील तर मग त्यांना हलवून जागे कोण करणार? हा प्रश्न राहील.