फुले महामंडळ व्यवस्थापकास लाच घेताना अटक
By Admin | Updated: January 1, 2015 01:21 IST2015-01-01T01:16:26+5:302015-01-01T01:21:53+5:30
फुले महामंडळ व्यवस्थापकास लाच घेताना अटक

फुले महामंडळ व्यवस्थापकास लाच घेताना अटक
नाशिक : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडे दाखल केलेला तक्रारदाराचा कर्जाचा प्रस्ताव प्रादेशिक व्यवस्थापकांकडे पाठविण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करून ती घेणारे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष नवनाथ शिंदे यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले़
टुर्स व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असलेले तक्रारदार व त्यांच्या नातेवाइकांनी महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून नवीन प्रवासी बस विकत घेण्यासाठी कर्ज मिळावे यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडे कर्जाचे प्रकरण तयार करून ते जिल्हा व्यवस्थापक संतोष नवनाथ शिंदे यांच्याकडे दिले होते़ या प्रकरणाची छाननी करून प्रकरणाचा प्रस्ताव तयार करून हे कर्ज प्रकरण महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांकडे मंजुरीस पाठविण्यासाठी शिंदे यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली होती़ त्याचा पहिला हप्ता म्हणून पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असे तक्रारदारास सांगण्यात आले होते़ याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा लावला़ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ कार्यालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून पन्नास हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच व्यवस्थापक संतोष शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ संतोष शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक बी़ एस़ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली़ (प्रतिनिधी)