नद्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 22:18 IST2016-07-12T22:17:07+5:302016-07-12T22:18:59+5:30

पेठ, दिंडोरीत पाऊस : तालुक्याचा संपर्क तुटला

Flood the rivers | नद्यांना पूर

नद्यांना पूर

पेठ : मंगळवार सकाळपासून पेठ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नाशिक-पेठ महामार्ग वगळता सर्व रस्ते बंद पडल्याने जवळपास निम्म्या तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
मंगळवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाने सुरु वात केल्याने पेठ -जोगमोडी रस्त्यावर संगमेश्वरनजीक पुलावर पाणी आल्याने जवळपास पूर्वेकडील निम्म्या तालुक्याचा पेठशी संपर्क तुटला, तर उस्थळेजवळ नदीला मोठा पूर आल्याने उस्थळे, हनुमंतपाडा, हेदपाडा, एकदरेकडील वाहने व नागरिक अडकून पडले. दिवसभर झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण तालुका जलमय झाला.
भुवन घाट वाहतुकीसाठी बंद
पेठच्या पश्चिमेकडील भुवन घाटात दोन-तीन ठिकाणी दगड-माती रस्त्यावर आल्याने घाटाखालील भुवन, आंबापाणी, खडकी, खामशेत, बोरपाडा, धानपाडा आदि पंधरा ते वीस गावांची या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली असून, पेठला येण्यासाठी आडगाव मार्गे वळसा घालून यावे लागत आहे.
पेरण्या जोमाने सुरू
नांदगाव : तालुक्यात पेरण्या जोमाने सुरू असून, या आठवड्यात १०० टक्के पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांनी दिली. दि. ११ जुलैपर्यंत तालुक्याची पर्जन्य सरासरी १४२ मि.मी. आहे. नांदगाव मंडूलात २२१ मि.मी. व मनमाड मंडलात १५० मि.मी. पर्जन्याची नोंद झाली आहे. यंदा कापसाचे क्षेत्र कमी (९६३९ हे.) झाले आहे. कृषी विभागाच्या आंतरपीक प्रचाराला यश आले असून, कडधान्याची (तूर, मूग, उडीद) तीन हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्याच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली असून, २८,५०० हेक्टर मका क्षेत्र आहे. बाजरी १६,००० हेक्टर, तर भुईमूग १००० हेक्टर आहे. यंदाचे एकूण पेरणी उद्दिष्ट ५८,५०० हेक्टर ठरविण्यात आले असल्याची माहिती कुळधर यांनी
दिली. मनमाड विभागात उशिरा पाऊस सुरू झाल्याने तेथील पेरणीची कामे उशिरा सुरू झाली आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात जातेगाव व वेहेळगाव परिसरात पर्जन्यमान तुलनेने अधिक आहे. (लोकमत ब्युरो)

Web Title: Flood the rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.