नाशिक : महापालिकेच्या वर्षभरावर आलेल्या निवडणुकीमुळे आताच राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात मायको सर्कल आणि त्रिमूर्ती चौक येथील उड्डाणपुलावरून भाजप-सेनेत श्रेयवादाबरोबरच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. हे पूल बांधण्याचे श्रेय शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर घेत असतानाच महापौर सतीश कुलकर्णी आणि आमदार सीमा हिरे यांनी हे भाजपचेच श्रेय असल्याचे सांगून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे बडगुजर यांनी सीमा हिरे यांचा संंबंधच काय, असा प्रश्न करीत त्यांनी पत्रव्यवहार दाखवावा, असे खुले आव्हान दिले आहे. शहारातील दोन ठिकाणी उड्डाणपुल साकारण्याबरोबच आगामी नव्या विकास प्रकल्पांची घोषणा करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या रामायण या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सेनेचे दावे खोडून काढण्यात आले. विकासकामांचे खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये असे महापौरांनी सुनावले तर आमदार सीमा हिरे यांनी आपण केलेल्या कामांची माहिती दिली. नाशिक शहरातील मायको सर्कल (भवानी चौक) येथे पाच ते सहा रस्ते एकत्र येत असल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्याबरोबर सिडकोत दिव्य ॲडलॅब ते त्रिमूर्ती चौकदरम्यान इंग्रजी वाय आकाराचे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने ४० व ३५ कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. त्यावरून सध्या सेना आणि भाजपत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
महापौर कुलकर्णी, सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितले की, राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या सूचनेनुसार शहरात वाहतुकीचा बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या बघता हा आराखडा तयार करून त्यातील दोन पुल प्राधान्याने घेण्यात आले आहेत. त्यासाठी पुरेसा निधी नव्हता त्यामुळे निविदा निघण्यात अडचणी हेात्या. परंतु त्यासाठी उपसूचनेव्दारे उड्डाणपुलांसाठी विशेष तरतूद आगामी अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. त्यानंतर या पुलाच्या निविदा काढण्यात आल्या. शिवसेनेचा याच्याशी संबंध नाही. त्यांनी राज्यात सत्ता आल्याने संकट काळात अडीचशे ते तीनशे कोटी रूपयांचे अनुदान द्यावे, पुलांचे श्रेय त्यांनाच देण्यात येईल असे जगदीश पाटील यांनी सांगितले.
कोट...
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून सातत्याने भाजपने केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्याचे उड्डाणपुल हे भाजपच्या सदस्यांच्या मागणीनुसार नियोजित केले आहेत. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजीच्या महासभेत तरतूद करून निविदा मागवल्या आहेत. त्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही.
सतीश कुलकर्णी, महापौर
कोट...
त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलासाठी मागणी केली हेाती. हा पूल होणे आवश्यक आहे. त्यातून शहराचे व्यापक हित साध्य होऊन या भागातील अपघात टळण्यास मदत हेाईल. या विषयावर राजकारण करू नये.
- सीमा हिरे, आमदार