फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय तेजीत
By Admin | Updated: February 15, 2017 00:43 IST2017-02-15T00:43:37+5:302017-02-15T00:43:49+5:30
पोस्टरबाजी : विविध पक्षश्रेष्ठींच्या सभांची तयारी

फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय तेजीत
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांकडून प्रचारासाठी मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात येत असून, फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिकांकडे पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी लहान-मोठ्या आकारांचे फ्लेक्स तयार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे प्रिंटिंग व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत आला असून, नेहमीच्या तुलनेत प्रिंटिंग व्यवसायात निवडणुकीच्या कालावधीत ५५ ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रचार वाहनांवर लावण्यासाठी तसेच पक्षश्रेष्ठींच्या सभांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे मोठे फ्लेक्स बनवून घेण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवार प्रतिनिधींची फ्लेक्स प्रिटिंग व्यावसायिकांकडे रीघ लागली आहे. निवडणूक तोंडावर आली की, राजकीय नेतेमंडळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी फ्लेक्सचा वापर करतात. त्याचा फायदा फ्लेक्स व्यावसायिकांना होत असून, साधारण ८ ते १० रु पये प्रतिचौरस फूट खर्च येतो. साधा १० बाय १० च्या फ्लेक्ससाठी ३ हजार रु पयांपासून पुढे खर्च येतो; तसेच ४० बाय ८० फ्लेक्ससाठी किमान ४५ ते ५० हजार रु पये खर्च येतो. त्याचबरोबर फ्लेक्स लावण्यासाठी कामगारांना किमान ५ ते ७ रु पये चौरस फूट खर्च येतो. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असे फ्लेक्स लावायचे असल्यास त्या ठिकाणांचे दरही जास्त असल्याचे व्यावसायिक सांगतात. आचारसंहितेच्या अगोदर विविध पक्षांच्या नेते मंडळींचे फ्लेक्सवॉर मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यांच्या फ्लेक्स वॉरमुळे तत्काळ फ्लेक्स तयार करून देणाऱ्या व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले होते. आता निवडणूक रणधुमाळीच्या कालावधीत वेळेवर फ्लेक्स तयार करून मिळत असल्याने तसेच फ्लेक्सचे दर निश्चित करतानाही घासाघीस करावी लागत नसल्याने अनेक उमेदवारांनी पूर्वीच्याच व्यावसायिकांक डून काम करून घेणे पसंत केले आहे. त्याचबरोबर काही इच्छुकांनी लहान आकाराची पत्रकेही आचारसंहितेच्या अगोेदरपासूनच वाटप करण्याचा धडाका सुरू केला होता. त्यात आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका इच्छुकाकडून सुमारे ५० हजारांहून अधिक पत्रके छापण्यात येत असून, त्यामधून व्यावसायिकांना चांगलेच उत्पन्न मिळत आहे. एक पत्रक छापण्यासाठी ५ रुपये ते १५ रुपयांपर्यंत दर आहेत. पत्रकासाठी वापरण्यात येणाऱ्या कागदाच्या आणि रंगांच्या गुणवत्तेवर हे दर ठरत असून, काही अपक्ष उमेदवार झेरॉक्सवर काम चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)