पुलावरून करावा लागतो जीवघेणा प्रवास

By Admin | Updated: October 23, 2016 22:48 IST2016-10-23T22:47:32+5:302016-10-23T22:48:04+5:30

गोदावरी : बंदी असूनही अवजड वाहनांची ये-जा सुरूच

Fleet Travel | पुलावरून करावा लागतो जीवघेणा प्रवास

पुलावरून करावा लागतो जीवघेणा प्रवास

सायखेडा : येथील गोदावरी नदीवरील पुलाच्या कठड्यावरील संरक्षक पोल पाऊस बंद होऊन दोन महिने उलटले असले तरी अद्याप उभे न केल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. पावसाळ्यात गोदावरी नदीला पूर आलेला असताना पुलावरून वेगात पाणी वाहून जावे, कचरा अडकून पुलाला धोका निर्माण होऊ नये म्हणून पोल खाली केले होते. इतके दिवस होऊनही पोल ‘जैसे थे’ असल्याने ते तत्काळ उभे करावे, अशी मागणी होत आहे.
रायगड जिल्ह्यात सावित्री नदीच्या दुर्घटनेनंतर सावधगिरी म्हणून गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासाठी मोठी वाहने जाऊ नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला पिलर उभे करून ठरावीक उंचीवर आडवी कमान उभी करण्यात येणार होती. संबंधित विभागाने फक्त दोन्ही बाजूला पिलर उभे केले पण वरील बाजूला कमान उभी न केल्याने बसशिवाय इतर सर्व प्रकारची वाहने सर्रासपणे चालू आहे. त्यामुळे दुर्दैवाने काही घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. गोदावरीला आलेल्या महापुरानंतर जुनाट झालेल्या तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सायखेडा येथील पुलाजवळ बांधकाम विभागाने पूल कमकुवत असून, अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याचा बोर्ड लावला आहे; मात्र प्रशासनाच्या या सूचनेची दखल फक्त महामंडळाच्या बसेसनेच घेतली असल्याचा सूर जनसामान्यांत उमटतो आहे. कारण इतर अवजड वाहने टेम्पो, ट्रक आदि सर्रास त्यावरून ये-जा करतात आणि बसेस मात्र पुलाच्या जवळ येऊनच थांबत असल्याने नागरिकांची, विद्यार्थी वर्गाची व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे. त्यामुळे गोदाकाठ भागातील अनेक गावांना बसचे दर्शन होत नाही. उच्च शिक्षण व नोकरीकरता ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक येत असतात. मोठी बस येऊ शकत नसली, तरी पुलावरून मिनी बसेस जाऊ शकत असल्याने त्या बसेसची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी, विद्यार्थी करत आहेत. (वार्ताहर)
 

Web Title: Fleet Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.