फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजावतरण
By Admin | Updated: August 10, 2016 00:31 IST2016-08-10T00:31:08+5:302016-08-10T00:31:41+5:30
जय्यत तयारी : प्रशासकीय यंत्रणेकडून आढावा

फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजावतरण
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचा समारोप येत्या गुरुवारी (दि.११) रात्री नऊ वाजून ३१ मिनिटांनी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व वल्लभपीठाचे वल्लभाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभमेळ्याच्या ध्वजावतरण सोहळा पार पडणार आहे. देवी-देवतांची उत्तरपूजा झाल्यानंतर रामकुंडावरील ध्वज खाली उतरविण्यात येणार आहे.
सिंहाचा गुरू राशीमध्ये प्रवेश होताच १४ जुलै २०१५ पासून सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात झाली होती. येत्या अकरा तारखेला नऊ वाजून ३१ मिनिटांनी गुरू सिंहमधून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याबरोबरच सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता होणार असल्याची माहिती गंगा-गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली.
गेल्या आठवड्यात आलेल्या महापुराने गोदामाईने धोक्याची पातळी ओलांडली होती. कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत गाळाचे साम्राज्य पसरले होते. गंगा-गोदावरीसह सर्वच मंदिरे पाण्याखाली बुडाली होती. यामुळे ध्वजावतरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे संपूर्ण गाळाचे साम्राज्य संपुष्टात आले असून, गंगा-गोदावरी मंदिरासह रामकुंडाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. रामकुंड परिसर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजावतरण सोहळ्यासाठी सज्ज करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.९) जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, आमदार बाळासाहेब सानप, महंत भक्तिचरणदास, मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, शहर अभियंता सुनील खुने, सतीश शुक्ल, पोलीस उपआयुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सर्व मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहणी करून सोहळ्याच्या नियोजनाची आखणी केली. (प्रतिनिधी)