पुढील महिन्यात ध्वजावतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2016 23:21 IST2016-07-15T23:14:41+5:302016-07-15T23:21:15+5:30
त्र्यंबकेश्वर : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येणार

पुढील महिन्यात ध्वजावतरण
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजावतरण सोहळ्याप्रसंगी भारतातील विविध मान्यवरांना निमंत्रण देण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रिय मंत्री जन. व्हि.के.सिंग तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा सन २०१४-१५ मध्ये संपन्न झाला. तथापि कुंभपर्वकाल १३ महिन्यांचा होता. दि. १४ जुलै २०१५ रोजी सिंहस्थास पहाटे प्रारंभ झाला होता. या दिवशी गुरुचा सिंह राशीत प्रवेश झाला होता. तर दि. ११ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री ९.०० ते ९.३० दरम्यान सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार असल्याने सिंहस्थाची समाप्ती होणार आहे. म्हणून या दिवशी सिंहस्थ ध्वजावतरण होणार आहे.
ध्वजावतरण सोहळा त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व त्र्यंबक नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. पाहुण्यांना निमंत्रण वगैरे देण्यासाठी पुरोहित संघाचे पदाधिकारी, त्र्यंबक नगर पालिकेचे पदाधिकारी व देवस्थानचे विश्वस्थ मंडळ संयुक्त प्रयत्न करीत आहेत. या ध्वजावतरण सोहळ्यासाठी अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, आंतरराष्ट्रीय संरक्षक श्रीमहंत हरिगिरीजी महाराज, श्रीमहंत शंकरानंद सरस्वती (भगवानबाबा) या बरोबरच त्र्यंबकेश्वरमधील सर्व अखाड्यांचे प्रमुख ठाणापती महंत उपस्थित राहणार आहेत.
त्र्यंबक नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजया लढ्ढा, संतोष कदम, धनंजय तुंगार, दिपक लढ्ढा, सुनिल अडसरे तसेच सर्व पालिका पदाधिकारी, मुख्याधिकारी चेतना केरुरे (मानूरे) सर्व नगरसेवक, पुरोहित संघ व विश्वस्थ मंडळ जय्यत तयारी करीत आहेत. (वार्ताहर)