शाळा,महाविद्यालयांमध्ये आज ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:46+5:302021-02-05T05:44:46+5:30
नाशिक : शहरातील विविध शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांसह शाळा महाविद्यालयांमध्ये ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी (दि.२६) सकाळी ...

शाळा,महाविद्यालयांमध्ये आज ध्वजारोहण
नाशिक : शहरातील विविध शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांसह शाळा महाविद्यालयांमध्ये ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी (दि.२६) सकाळी ध्वजारोहण करण्यात येणार असून शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिककरांनी विविध प्रकारच्या तिरंगा ध्वजांची खरेदी केली असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिककरांमध्ये देशभक्तीचे चैतन्य संचारल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय नागरिकांसाठी प्रजासत्ताक दिन म्हणजे राष्ट्रीय सण आहे. त्यामुळे संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. नाशिक शहरातही प्रजासत्ताक दिनानिमित्ताने उत्साहाचे वातावरण संचारले असून शाळा, महाविद्यालयात ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाकडून संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे, शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण सोहळ्याची मैदाने स्वच्छ करण्यात आली असून काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी कोरोनामुळे सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकणार नसले तरी उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहे. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय आणि काही खासगी संस्थांमध्येही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व ध्वज संहितेचे पालन करून ध्वजारोहण होणार आहे.
इन्फो-
संचलन मैदानावर कसून तपासणी
शहरातील प्रमुख सोहळा पोलीस संचलन मैदानावर होणार असल्याने याठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली. याठिकाणी पोलिसांनी कसून तपासणी केली . त्यासाठी श्वान पथकांसह बॉम्बशोधक पथकाचीही पोलिसांनी मदत घेतल्याचे दिसून आले.
इन्फो
बच्चे कंपनीसाठी तिरंगी फुगे
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत ठिकठिकाणी तिरंगी फुगे उपलब्ध असल्याचे दिसून आले. या फुग्यांना बच्चे कंपनीकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे नागरिकांनीही आपल्या कामाच्या ठिकाणी ठेवण्यासाठी, वाहनात लावण्यासाठी तिरंगा ध्वज आवर्जून घेतल्याचे दिसून आले.