स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:54+5:302021-08-15T04:17:54+5:30
नाशिक : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभाला रविवारपासून (दि.१५) प्रारंभ होत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकरोडच्या विभागीय ...

स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
नाशिक : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभाला रविवारपासून (दि.१५) प्रारंभ होत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता ध्वजारोहण कार्यक्रमास येताना नागरिकांनी तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मास्क लावणे आणि शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसेच यासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून ध्वजारोहण सोहळा होणार असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन वर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अपेक्षित असले तरी कोरोनामुळे दक्षता म्हणून केवळ पारंपरिक पद्धतीने ध्वजारोहण आणि ध्वजवंदनानंतर सोहळ्याची सांगता होणार आहे.
इन्फो
सर्व शाळांमध्ये उत्साह
यंदाचा स्वातंत्र्य दिन हा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा वर्षारंभ असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शासकीय, मनपा, संस्था आणि खासगी शाळांमध्ये संचालक, शिक्षकांसह मोजक्याच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा सोहळा रंगणार आहे. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काही प्रमाणात तरी शाळा गजबजणार असल्याने शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. बहुतांश शाळांमध्ये शनिवारपासूनच स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याशिवाय येथील गुलालवाडी आणि यशवंत व्यायामशाळेत रविवारी सकाळी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन आणि प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सकाळी ७.३० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
इन्फो
अमेरिकेतही स्वातंत्र्य दिनानिमित्त वाजणार ‘नाशिक ढोल’
नाशिकचे रहिवासी आणि प्रख्यात वैद्य सुनील औंधकर यांचे चिरंजीव प्रणव औंधकर यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील न्यू याॅर्कच्या जगप्रसिद्ध टाइम स्क्वेअर या चौकात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ६०हून अधिक वादकांच्या उपस्थितीत ढोलवादनाचा कार्यक्रम रंगणार आहे. प्रणव यांच्या पुढाकाराने मिशिगन स्टेटमधील डेट्रॉईटला ढोलपथकाची स्थापना करण्यात आली आहे. याच पथकाच्या माध्यमातून न्यू यॉर्कला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता हा ढोलवादनाचा सोहळा रंगणार आहे.