सुविधांसाठी संघर्ष पाचवीला पूजलेला
By Admin | Updated: November 16, 2016 01:46 IST2016-11-16T01:50:02+5:302016-11-16T01:46:28+5:30
कोकणीपुरा, बागवानपुरा : ‘दुबई वॉर्ड’ विकासापासून वंचित

सुविधांसाठी संघर्ष पाचवीला पूजलेला
अझहर शेख नाशिक
जुन्या नाशकातील सध्याच्या ‘दुबई वॉर्ड’ची व्याप्ती वाढली आहे. मुस्लीमबहुल प्रभाग म्हणून ओळख असलेल्या दुबई वॉर्डला जोडल्या गेलेल्या नवीन भागामुळे प्रभागाची ओळख काही प्रमाणात बदलणार आहे. १९९२ पासून या प्रभागातील जनतेने कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन पक्षांवर विश्वास दाखविला. प्रभागाचा विकास पाहिजे त्या प्रमाणात त्यावेळी झाला नाही. येथील नागरिकांना गावठाण भाग म्हणून सोयीसुविधांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागत आला आहे.
सध्याचा प्रभाग २६ मधील परिसराचा गेल्या पाच वर्षांमध्ये कायापालट झाला; मात्र प्रभाग २८ चा परिसर जो नव्याने प्रभाग १४ मध्ये समाविष्ट झाला आहे त्या परिसरात अजूनही सोयीसुविधांची वानवा जाणवते. प्रभाग २८ मधून अपक्ष उमेदवारांनी प्रतिनिधित्व केले आहे तर प्रभाग ३९ चा काही भाग सध्याच्या प्रभाग १४ मध्ये समाविष्ट असून. या भागात मनसेचे उमेदवार निवडून आले आहे तर प्रभाग २९ मधील काही भागही या प्रभागाला जोडला गेला असून, सध्या प्रभाग २९ मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक १४ मध्ये सध्याचा संपूर्ण प्रभाग २६, प्रभाग २८, प्रभाग ३९, प्रभाग २९ च्या परिसराची भर पडली आहे. त्यामुळे ‘दुबई वॉर्ड’मध्ये यंदा मोठ्या प्रमाणात चुरस रंगणार आहे. प्रभागासाठी आरक्षण अनुसूचित जाती महिला ओबीसी महिला व सर्वसाधारणच्या दोन जागा असल्यामुळे उड्या पडणार आहेत. प्रभागाचा राजकीय इतिहास बघितला असता कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे; मात्र या पंचवार्षिक निवडणुकीदरम्यान प्रभागाची व्याप्ती लक्षात घेता यंदा या प्रभागातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. येथील आरक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन जागा सर्वसाधारण गटासाठी आहे. यामुळे भाऊगर्दी होणार आहे.
राजकीय पार्श्वभूमी
९९२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये या प्रभागातून शेख नसीर हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. १९९७ साली महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसवर लोकांनी विश्वास दाखविला आणि सिराज जीन हे निवडून आले. त्यानंतर २००२ साली कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मैनुद्दीन कोकणी व रेश्मा मुल्ला हे दोन्ही उमेदवार निवडून आले, तर बिलाल खतीब हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. २००७ साली झालेल्या निवडणुकीत निजाम कोकणी निवडून आले. २०१२ साली पुन्हा राष्ट्रवादी, कॉँग्रेसचे दोन उमेदवार जनतेने निवडून दिले. यामध्ये कॉँग्रेसच्या समिना मेमन, राष्ट्रवादीचे सुफीयान जीन यांच्याकडे प्रतिनिधित्व आले. संपूर्ण राज्यासह शहरातही मनसेची लाट असताना ‘दुबई वॉर्ड’ अपवाद ठरला व मनसेच्या उमेदवार लता कमोद यांचा दारुण पराभव झाला. प्रभाग २८मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर संजय साबळे तर शबाना पठाण या अपक्ष म्हणून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्या. प्रभागाचा कौल बघता यावेळी निवडणुकीच्या दृष्टीने पठाण यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.