मेशी - दहा वर्षापुर्वी साडेआठ कोटी रुपये खर्च करुनही मेशीसह पाचगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद असल्याने गाव व परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.सदर योजना तब्बल दहा वर्षापासून धुळ खात पडली असून शासनाचा पैसा लोकप्रतिनिधी व अधिकार्यांच्या दुरदृष्टी अभावी अक्षरश: पाण्यात गेला आहे. योजनेत समाविष्ट असलेल्या मेशी, महालपाटणे, वासोळ, डोंगरगाव व रणादेवपाडे या पाच गावांपैकी चार गावांना योजनेतील पाण्याची फारशी गरज नसल्याने योजनेचे संनियंत्रण व देखभाल सर्व एका गावावर भागविणे अशक्य आहे. मुळात योजना बनवितांनाच गावाची निवड योग्य पद्धतीने झाली नसल्याची चर्चा जाणकारांकडून व्यक्त करण्यात येते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून योजना तयार करण्यात आली असून समाविष्ट गावांपैकी डोंगरगाव व रणादेवपाडे या गावाना योजनेचा देखभाल व वीजबील खर्च परवडत नाही. तर वासोळ व महालपाटणे या गावाना योजनेच्या पाण्याची विशेष गरज भासत नाही कारण हे गावे गिरणातीरावर वसलेले असल्याने चणकापुर धरणाचे पाणी गिरणा नदीला सोडले जाते. पारंपारिक स्त्रोत बळकट असल्याने त्यांनाही योजनेची आवश्यकता भासत नाही. केवळ मेशी गावासाठी संपुर्ण योजनेचा देखभाल खर्च उत्पन्नापेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शासनाचे साडेआठ कोटी रुपये वाया जाऊ नये यासाठी ही योजना जिल्हापरिषदेने हस्तांतरीत करावी व योजना सुरु करण्यासाठी तोडगा काढावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.मेशी प्रादेशिक पाणी योजना दहा वर्षापासून बंद असुन योजना दुरुस्तीचे अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीकडे टँकर मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे.केदा शिरसाठ(पं.स. सदस्य देवळा)मेशी प्रादेशिक पाणीयोजना एक तर दुरुस्त करावी किंवा नव्याने पुरक योजना मंजुर व्हावी व दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाई दुर करावी.गंगाधर शिरसाठ(माजी सभापती विकास सोसायटी मेशी)
मेशीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना बंद
By admin | Updated: May 7, 2014 21:30 IST