गणेशोत्सव कालावधीत पाच हजार टन कचरा
By Admin | Updated: September 18, 2016 17:04 IST2016-09-18T17:00:48+5:302016-09-18T17:04:50+5:30
संकलन : ना.रोड, पूर्वमध्ये सर्वाधिक कचरा

गणेशोत्सव कालावधीत पाच हजार टन कचरा
नाशिक : शहरातून एरवी प्रतिदिन सुमारे ३८० ते ४०० टन कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमार्फत उचलला जातो. परंतु, गणेशोत्सव कालावधीत शहरातील सहाही विभागातून सुमारे पाच हजार टन कचरा खतप्रकल्पावर नेण्यात आला आहे. प्रामुख्याने, नाशिकरोड आणि पूर्व विभागातून प्रत्येकी हजार टन कचरा उचलण्यात आल्याची नोंद खतप्रकल्पावर झाली आहे.
घंटागाड्यांमार्फत शहरातून दैनंदिन कचरा संकलन केले जाते. दि. ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत शहरात गणेशोत्सव साजरा झाला. यंदा गणेशोत्सवात ८५० हून अधिक सार्वजनिक मंडळांनी सहभाग नोंदविला होता. निर्माल्य संकलित करण्यासाठी ठिकठिकाणी निर्माल्य कलश उपलब्ध करून दिले होते. गणेशोत्सवाच्या कालावधीत महापालिकेमार्फत दैनंदिन साफसफाई करण्यात आली असता प्रत्येक दिवशी ४०० ते ४५० टन कचरा उचलण्यात आला. उत्सव काळात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या आरास बघण्यासाठी नाशिककरांनी तोबा गर्दी केली होती. त्यात ठिकठिकाणी खाद्यपदार्थ, खेळणी व अन्य वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने घाण-कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर भर पडली. दि. ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत महापालिकेने ४७१९ टन कचरा उचलला. त्यात नाशिक पूर्व विभागातून ९५३ टन, नाशिक पश्चिम - ६१२ टन, नाशिकरोड - ९५३ टन, पंचवटी विभाग - ७८० टन, सिडको विभाग - ८८४ टन तर सातपूर विभागातून ५३४ टन कचरा उचलण्यात आला. (प्रतिनिधी)