अवघ्या साडेतीन किलोमीटर अंंतरात पाच सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:19 IST2017-08-05T00:03:45+5:302017-08-05T00:19:19+5:30

Five Signals in just three and a half kilometers | अवघ्या साडेतीन किलोमीटर अंंतरात पाच सिग्नल

अवघ्या साडेतीन किलोमीटर अंंतरात पाच सिग्नल

नाशिक : अशोकस्तंभ ते जेहान सर्कल अंतर किती? अवघे तीन ते साडेतीन किलोमीटर! मात्र आता हे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच सिग्नल पार करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एका ठिकाणी तर अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर दोन सिग्नल असल्याने आता घाईच्या वेळी गंगापूररोडवरून जावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहराची वाहतूक समस्या एका वेगळ्या वळणावर जात असून, त्यासाठी करीत असलेली कृती मात्र जणू अगतिक असल्याचे दिसत आहे. त्यामागे नागरिकांच्या सोयीचा विचार असला तरी अवघ्या तीन किलोमीटर अंतरात पाच सिग्नल असतील तर सोय आहे की गैरसोय, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक सुधारणांचा धडाका सुरू झाला आहे. त्यात यंत्रणेच्या नियोजनाचा भाग अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी जेहान सर्कल येथे दोन अपघातात दोन महिलांचा बळी गेला होता. त्यावेळी हा चौक धोकादायक असल्याची नागरिकांची तक्रार होती आणि त्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी तत्परतेने या चौकात सिग्नल लावण्याचे आश्वासन दिले तसेच ते पूर्णही केले. परंतु आता याचवेळी या मार्गावर पाच सिग्नल करण्याचे सूतोवाच यंत्रणेने केले आणि त्याबरहुकूम कार्यवाही होत आहे. जेहान सर्कल आणि तेथून अशोकस्तंभ दरम्यान जुना गंगापूर नाका येथे एक सिग्नल अगोदरच कार्यान्वित झाला आहे. परंतु आता प्रसाद सर्कल त्यापुढे थत्तेनगर येथे सर्कल होणार आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. याच मार्गावर पुढे पंडित कॉलनीतून बाहेर पडणाºया म्हणजेच रावसाहेब थोरात सभागृहाजवळील चौकात अगोदरच सिग्नल मंजूर करण्यात आले आहे. महापालिकेत या सिग्नलवरून सेना-भाजपाच्या दोन नगरसेवकांमध्ये झालेला वादही त्यावेळी गाजला होता. आता तीन किलोमीटरमध्ये पाच सिग्नल आणि त्यातील दोन म्हणजेच थत्तेनगर ते प्रसाद सर्कल अगदी दोन अडीचशे मीटर अंतरावरच सिग्नल आहे. पोलीस आणि महापालिका सिग्नलचे टायमिंग सिंक्रोनाइज करणार असली म्हणजेच एक सिग्नल सुटला की वाहनचालकाला सर्व सिग्नल रांगेत मिळतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. परंतु गर्दीच्या वेळी जेहान सर्कलकडे जाणारी वाहतूक प्रसाद सर्कलजवळ अडकली आणि त्याचवेळी थत्तेनगर येथून सिग्नल सुटला तर येथे वाहनांच्या किती रांगा लागतील हा प्रश्न आहे. केवळ गंगापूररोडवरच असा प्रकार आहे अशातला भाग नाही तर कॉलेजरोडवरदेखील बिग बाजार मॉलजवळील चौक आणि त्याच्या पुढे लगेच हॉलमॉर्क चौकात सिग्नल असणार आहे.
मुळात हॉलमार्क चौक हा काय प्रकार? असा प्रश्न पोलिसांच्या प्रगटनानंतर अनेकांना पडला. प्रिं. टी. ए. कुलकर्णी चौक हीच ती जागा आहे. परंतु पोलीस यंत्रणेनेच जाहीर केलेले चौक गोंधळात टाकणारे आहे. असाच प्रकार त्र्यंबकरोडच्या बाबतीत होणार आहे. मायको सर्कल हटवून त्या जागी सिग्नल बसविण्यात येणार आहे. त्याच्याच पुढे ग्रीन व्ह्यू हॉटेलसमोरील चौकात सिग्नल आहे. त्यामुळे या तिन्ही मार्गांवर वाहन चालविताना थांबत थांबत जावे लागणार आहे.

Web Title: Five Signals in just three and a half kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.