सोसायटी गटातील पाच जागा बिनविरोध
By Admin | Updated: April 25, 2015 01:37 IST2015-04-25T01:37:49+5:302015-04-25T01:37:51+5:30
सोसायटी गटातील पाच जागा बिनविरोध

सोसायटी गटातील पाच जागा बिनविरोध
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोसायटी गटातून पाच तालुक्यांतून प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने पाच जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित सोळा जागांसाठी २५० नामांकन दाखल झाले असून, इच्छुकांनी गर्दी पाहता तीन पॅनल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये किशोर दराडे (येवला), सचिन शंकरराव सावंत (सटाणा), आमदार जिवा पांडू गावित (सुरगाणा), संदीप गोपाळ गुळवे (इगतपुरी) व नामदेव हलकंदर (पेठ) या सोसायटी गटातील उमेदवारांचा समावेश आहे. दुपारी तीन वाजता नामांकन दाखल करण्याची वेळ संपताच या गटातून एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जवळपास स्पष्ट होताच, समर्थक कार्यकर्त्यांनी बॅँकेबाहेरच प्रचंड जल्लोष केला. बॅँकेच्या गेल्या निवडणुकीत दहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. यंदा मात्र इच्छुकांमध्ये चुरस वाढल्यामुळे हीच संख्या पाचवर येऊन थांबली असून, ज्यांचा सोसायटी गटात आजवर दबदबा मानला गेला, त्यांनाही स्पर्धा करावी लागणार आहे. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये संदीप गुळवे, सचिन सावंत, किशोर दराडे, नामदेव हलकंदर हे चारही चेहरे नवीन आहेत. या निवडणुकीसाठी आजी-माजी संचालकांखेरीज नवीन चेहऱ्यांनीही प्रस्थापितांना आव्हान देण्याची तयारीकेली असून, अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने जिल्हाभरातून मोठ्या संख्येने बॅँकेत गर्दी झाली होती. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले, याच ठिकाणी राजकारणाचे फड रंगले होते. विरोधकांवर लक्ष ठेवण्याबरोबरच समर्तकांनाही परावृत्त करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची सोमवारी छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.