पंधरा तालुक्यांच्या मूल्यांकनाची पाच अधिकाऱ्यांवर जबाबदारी
By Admin | Updated: January 31, 2017 01:21 IST2017-01-31T01:21:13+5:302017-01-31T01:21:29+5:30
मुख्यमंत्र्यांच्या सूचना : योजनांची करणार तपासणी

पंधरा तालुक्यांच्या मूल्यांकनाची पाच अधिकाऱ्यांवर जबाबदारी
नाशिक : महाराष्ट्र राज्य २०१८ पूर्वी हागणदारीमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांनी ध्यास घेतला असून, त्यादृष्टीने प्रत्येक जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर यासंदर्भात कामकाजाचे मूल्यांकन व तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पंधरा तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यासंदर्भात स्वत:सह पाच खातेप्रमुखांवर या पंधरा तालुक्यांमध्ये जाऊन तपासणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे चार तालुक्यांची जबाबदारी असून, त्यात मालेगाव, नांदगाव, बागलाण, येवला या तालुक्यांचा समावेश आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्यावर निफाड, देवळा व सिन्नर तसेच प्रभारी जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक संदीप माळोदे यांच्यावर दिंडोरी, कळवण, इगतपुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांच्याकडे पेठ, सुरगाणा, नाशिक तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) त्र्यंबकेश्वर चांदवड आदि तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)