पाच नगराध्यक्ष बिनविरोध
By Admin | Updated: November 24, 2015 23:15 IST2015-11-24T23:14:47+5:302015-11-24T23:15:20+5:30
औपचारिक घोषणा सोमवारी : शेलार, अहेर, लहरे, सातपुते, पगार पहिले नगराध्यक्ष

पाच नगराध्यक्ष बिनविरोध
नाशिक : जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी केवळ एकेकच अर्ज आल्याने या पाचही ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, त्याची औपचारिक घोषणा सोमवारी (दि. ३०) नोव्हेंबरला होणार आहे.
निफाड नगरपंचायतीसाठी भाजपाचे राजाराम शेलार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध मानली जात आहे. त्याचप्रमाणे देवळा नगरपंचायतीसाठी शहर विकास आघाडीच्या; परंतु भाजपा सभापती केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. (पान ९ वर)
तसेच सुरगाणा नगरपंचायतीसाठी भाजपाच्याच रंजना लहरे, कळवण नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुनीता कौतिक पगार, तर पेठ नगरपंचायतीसाठी शिवसेनेच्या लता भूपेंद्र सातपुते यांचाही एकमेव अर्ज आल्याने सुरगाणा, कळवण व पेठ नगरपंचायतीसाठी अनुक्रमे रंजना लहरे, सुनीता पगार व लता सातपुते यांची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड मानली जात आहे. चांदवड पंचायत समितीसाठी मात्र माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असल्याने येथील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. चांदवड नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे भूषण कासलीवाल यांच्यासह नवनाथ अहेर व देवीदास (राजू) शेलार यांचेही उमेदवारी अर्ज आल्याने येथील निवडणूक ३० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. माघारीसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत कालावधी असून, या काळात जर कोेणी माघार घेतलीच तर चांदवड नगराध्यक्ष पदाची निवडणूकही बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अन्यथा येथे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी किंवा कॉँग्रेस अशी काट्याची लढत पहावयास मिळू शकते.(प्रतिनिधी)