पाच महिन्याच्या तान्हुलीचा विहिरीत फेकून खून
By Admin | Updated: September 6, 2016 00:23 IST2016-09-06T00:23:43+5:302016-09-06T00:23:57+5:30
दिंडोरी तालुक्यातील घटना : पोळीभाजी मागण्याचा बहाणा

पाच महिन्याच्या तान्हुलीचा विहिरीत फेकून खून
वणी/पांडाणे : जेवणासाठी भाजीपोळी मागण्याचे निमित्त करून घरातील अवघ्या पाच महिन्यांच्या तान्ह्या मुलीला घरातून उचलून शेतातील विहिरीत फेकून तिचा खून केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील दहेगाव शिवारात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी दोन अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
दिंडोरी तालुक्यातील दहेगाव शिवारात ज्ञानेश्वर तुकाराम मेधणे यांची शेतजमीन असून, शेतीत त्यांचे वास्तव्य आहे. दुपारी पाऊणच्या सुमारास दोन अज्ञात इसम मेधणे यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आले.
घरात असलेल्या वंदना मेधणे यांच्याकडे त्यांनी जेवणासाठी भाजीपोळी मागितली. वंदना भाजी पोळी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता त्या संशयितांनी घरात असलेल्या पाच महिन्याच्या स्वरा मेधने या तान्हुलीला उचलले व बाहेर आले आणि जवळच असलेल्या विहिरीत तिला फेकून दिले. दरम्यान भाजीपोळी घेऊन वंदना मेधने आल्या असता दोघे संशयित दुचाकीवर बसून निघून गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यांनी स्वराचा शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही . संशयावरून घरालगत असलेल्या विहिरीत डोकावले असता स्वरा विहिरीत आढळून आली. ही बाब पोलिसांना कळविण्यात आली. स्वराला विहिरीबाहेर काढून वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले डॉ. राजेंद्र बागुल यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. नाकातोंडात पाणी गेल्याने स्वराचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष शव विच्छेदन अहवालात काढण्यात आला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, पोलीस निरीक्षक अनंत तारगे, पोलीस उपनिरिक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनाक्र म पाहता संवेदनशील बाब असल्याने स्थानिक गुन्हा शाखेची मदत घेऊन प्रकरणाच्या तळाशी जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी दिली. दरम्यान अतिरीक्त पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते यांनी या प्रकरणाचे गांभीर्य बघून सखोल चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. ज्ञानेश्वर मेधणे यांच्या तक्र ारीवरून दोन संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)