पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन
By Admin | Updated: September 21, 2015 23:29 IST2015-09-21T23:27:23+5:302015-09-21T23:29:10+5:30
गजबजला गोदाघाट : ‘सुखकर्ता- दुखहर्ता’चे घुमले स्वर

पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन
नाशिक : ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...’ या गणरायाच्या आरतीच्या स्वरांनी गोदाकाठ दुमदुमला होता. निमित्त होते, पाच दिवसांच्या गणपतीसह गौरी विसर्जनाचे! बहुसंख्य गणेशभक्तांनी आज आपल्या लाडक्या बाप्पाला पाच दिवसांच्या आराधनेनंतर भावपूर्ण निरोप दिला.
पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी दुतोंड्या मारुतीपासून तर गोदावरी-कपिला त्रिवेणी संगमापर्यंत गोदाघाट परिसरात भाविकांची संध्याकाळी गर्दी झाली होती. गणेशभक्त आपल्या कुटुंबीयांसमवेत मोठ्या भक्तिभावाने गोदाघाटावर येऊन गणेशमूर्तीची आरती क रत विसर्जन करत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला’, ‘एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार...’ असा जयघोष करत नदीपात्रात तरुणांनी उतरून बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, काही कु टुंबीयांनी गोदाघाटावर वाजत-गाजत जल्लोषात गणरायाची छोटेखानी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.
गौरी पटांगण, रोकडोबा घाट, टाळकुटेश्वर घाट, लक्ष्मीनारायण घाट, गोदावरी-कपिला संगम आदि ठिकाणी भाविकांनी पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.
गेल्या गुरुवारपासून (दि.१७) बाप्पांचे घरोघरी आगमन झाले होते. काही भाविकांनी दीड-दोन, पाच, सात दिवसांपर्यंत तसेच बहुसंख्य गणेश भक्तांच्या घरी बाप्पा अनंत चतुर्थीपर्यंत मुक्कामी राहणार आहेत. ज्या भक्तांनी पाच दिवसांपर्यंत गणपतीची प्रतिष्ठापना केली होती त्यांनी आज विधिवत गोदापात्रात गणरायाचे विसर्जन केले.