देशभरातील पाच कलावंतांत दोघा नाशिककरांचा ठसा
By Admin | Updated: February 4, 2016 23:23 IST2016-02-04T23:17:39+5:302016-02-04T23:23:33+5:30
नाशिकची दखल : दिग्दर्शक प्रवीण काळोखे, अभिनेत्री कल्याणी मुळे यांना प्रतिष्ठेची विनोद दोशी फेलोशिप

देशभरातील पाच कलावंतांत दोघा नाशिककरांचा ठसा
नाशिक : पुण्याच्या साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या विनोद दोशी फेलोशिपसाठी नाशिकच्या दोघा कलावंतांची निवड झाली आहे. येथील दिग्दर्शक प्रवीण काळोखे व अभिनेत्री कल्याणी मुळे यांना ही फेलोशिप जाहीर झाली आहे. एक लाख रुपयांच्या या फेलोशिपची कक्षा या वर्षीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत रुंदावण्यात आली आहे.
काळोखे व मुळे यांच्यासह या फेलोशिपसाठी बंगळुरूचे संदीप शिखर, पुण्यातील प्रकाशयोजनाकार व दिग्दर्शक विक्रांत ठकार, पॉँडेचेरीच्या नृत्यांगना निम्मी राफेल यांचीही निवड करण्यात आली आहे. काळोखे हे येथील प्रायोगिक रंगभूमीवरील सर्जनशील दिग्दर्शक असून, रंगसाधना, जीनिअस, कुसुमाग्रज प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून ते सुमारे पंधरा वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत, तर मुळे या मूळच्या नाशिकच्या असून, त्या नाटके, टीव्ही मालिका, चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवत आहेत.
या फेलोशिपचे प्रतिष्ठानचे यंदाचे अकरावे वर्ष असून, आतापर्यंत ४७ कलाकारांना फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. विनोद दोशी यांना कला व साहित्य क्षेत्रात प्रचंड रुची होती. सन २००३ मध्ये काही कलावंतांनी एकत्र येत साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या वतीने कलेच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या, महत्त्वाकांक्षी कारकीर्द करू इच्छिणाऱ्यांना फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपचे वितरण येत्या २१ फेब्रुवारी रोजी पुण्यात प्रख्यात कला संपादक व समीक्षक सदानंद मेनन यांच्या हस्ते होणार आहे.