नाशकात प्रथमच तबला-चिल्ला
By Admin | Updated: October 29, 2014 00:13 IST2014-10-29T00:13:12+5:302014-10-29T00:13:34+5:30
अमृतनाद : मुक्तांगण व कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे चार सत्रांत होणार अखंड तबलावादन

नाशकात प्रथमच तबला-चिल्ला
नाशिक : नाशिकमध्ये प्रथमच तबला-चिल्ला हा अखंड तबलावादनाचा कार्यक्रम होणार असून, येत्या शुक्रवारपासून तीन दिवस हा तालसोहळा कुसुमाग्रज स्मारकात रंगणार आहे. सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ नादसाधकांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गौरविण्यात येणार आहे.
मुक्तांगण व कुसुमाग्रज प्रतिष्ठान प्रस्तुत आणि आदिताल तबला अकादमी आयोजित ‘अमृतनाद’ हा कार्यक्रम दि. ३१ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. ज्येष्ठ तबलावादक पंडित नारायण जोशी, पंडित शशिकांत मुळे आणि पंडित कमलाकर वारे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश गायतोंडे, पंडित बापूसाहेब पटवर्धन आणि वेदमूर्ती पंडित शांतारामशास्त्री भानोसे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये प्रथमच तबला-चिल्ला हा अखंड तबलावादनाचा कार्यक्रम होत आहे. येत्या शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी ५ वाजता अथर्व वारे, सायली मधुरे, सुजित काळे व कल्याण देशपांडे तबलावादन करतील, तर शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता प्रमोद भडकमकर, माधव वर्तक, प्रसाद रहाणे, रसिक कुलकर्णी व नितीन डेगवेकर तबलावादन करतील. त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता नितीन पवार, सुधाकर पैठणकर, अभिमन्यू हेर्लेकर, आनंद शिधये यांचे तबलावादन होईल. दि. २ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वर सोनवणे यांचे संवादिनीवादन होणार असून, तबलासाथ दिगंबर सोनवणे करणार आहेत. त्यानंतर गिरीश गोगटे यांचे तबलावादन होईल. तबला-चिल्ला कार्यक्रमाचा समारोप ज्येष्ठ तबलावादक पंडित बापूसाहेब पटवर्धन यांच्या तबलावादनाने होईल. एकूण अठरा तबलावादक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)