सातपूरला प्रथमच कमळ फुलले
By Admin | Updated: February 24, 2017 01:26 IST2017-02-24T01:26:11+5:302017-02-24T01:26:26+5:30
सातपूरला प्रथमच कमळ फुलले

सातपूरला प्रथमच कमळ फुलले
गोकुळ सोनवणे सातपूर
कधी काँग्रेस, तर कधी शिवसेना, तर कधी मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या सातपूर विभागात महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत आता भाजपाचे कमळ फुलले आहे. प्रथमच १६ पैकी ८ जागांवर भाजपाने निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे, तर शिवसेनेने पाच जागांवर विजय संपादन केला आहे. मनसेला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर रिपाइंने एक जागा कायम ठेवली आहे.
महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सातपूर येथील महापालिकेच्या क्लब हाउस येथे आज सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८, ९, १० आणि ११ या चार प्रभागांतील १६ जागांसाठी १२६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात प्रभाग क्रमांक ८ मध्ये नगरसेवक विलास शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचे पूर्ण पॅनल विजयी झालेत. त्यात अनुसूचित जाती महिला गटातून कुमारी नयना गांगुर्डे यांनी भाजपाच्या अर्चना कोथमिरे यांच्यासह ११ उमेदवारांचा पराभव केला. अनुसूचित जमातीतील महिला गटातून शिवसेनेच्या राधा बेंडकुळे विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या विद्यमान नगरसेवक रेखा बेंडकुळे व माजी नगरसेवक उषा बेंडकुळे यांचा पराभव केला. ओबीसी गटातून भाजपाचे संतोष गायकवाड यांनी शिवसेनेचे अशोक जाधव यांच्यासह पाच उमेदवारांचा पराभव केला. सर्वसाधारण गटातून नगरसेवक विलास शिंदे यांनी नगरसेवक दिनकर पाटील यांचे पुत्र भाजपाचे उमेदवार अमोल पाटील यांच्यासह सात उमेदवारांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक ९ मधील लढतीकडे नाशिककरांचे लक्ष लागून होते. या प्रभागात नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपाचे पूर्ण पॅनल विजयी झाले. यात अनुसूचित जाती गटातून भाजपाचे रवींद्र धिवरे विजयी झाले. त्यांनी विद्यमान नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा आणि उर्वरित १२ उमेदवारांचा पराभव केला. ओबीसी महिला गटातून भाजपाच्या हेमलता कांडेकर यांनी शिवसेनेच्या ज्योती काळे व अपक्ष सुवर्णा मंडळ यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटातून भाजपाच्या वर्षा भालेराव विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या सविता गायकर यांच्यासह चार उमेदवारांचा पराभव केला. तमाम नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या सर्वसाधारण गटातून विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी त्यांचे पुतणे तथा माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील यांचा पराभव केला. या लढतीकडे उत्सुकतेने पाहिले जात होते.
प्रभाग क्रमांक १० मध्ये नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सर्व उमेदवार विजयी झालेत. यात ओबीसी गटातून भाजपाच्या माधुरी बोलकर यांनी शिवसेनेच्या वृषाली सोनवणे मनसेच्या फरिदा शेख काँग्रेसच्या प्रियंका सोनवणे यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला गटात भाजपाच्या पल्लवी पाटील यांनी अवघ्या ११ मतांची आघाडी घेत मनसेच्या कलावती सांगळे, शिवसेनेच्या मंदाकिनी गवळी यांच्यासह सात उमेदवारांच्या पराभव केला. सर्वसाधारण गटात मनसेतून भाजपात गेलेले माजी नगरसेवक शशिकांत जाधव विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेचे शांताराम कुटे यांच्यासह आठ उमेदवारांचा पराभव केला सर्वसाधारण गटात भाजपाचे सुदाम नागरे यांनी शिवसेनेचे गोकुळ नागरे यांच्यासह पाच उमेदवारांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक ११ मध्ये कोणत्याही एका पॅनलला निर्विवाद वर्चस्व स्थापन करता आले नाही. यात विद्यमान स्थायी समिती सभापती सलीम शेख आणि योगेश शेवरे हे दोघे मनसेचे उमेदवार विजयी झालेत. शेख यांनी भाजपाचे मंडल अध्यक्ष राजेश दराडे, शिवसेनेचे दीपक मौले यांच्यासह सात उमेदवारांचा पराभव केला, तर योगेश शेवरे यांनीही शिवसेनेचे सुभाष गुंबाडे, भाजपाचे विठ्ठल लहारे, माकपाचे माधव पुराणे, राष्ट्रवादीचे लक्ष्मण म्हसे यांचा पराभव केला. अनुसूचित जाती महिला गटात विद्यमान नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या स्नुषा रिपाइंच्या दीक्षा लोंढे यांनी सहज विजय संपादन केला.भाजपा बंडखोरीचा पराजय४प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार नितीन निगळ यांनी रिपाइंच्या दीक्षा लोंढे, अपक्ष अमित मांडवे, जयश्री धोत्रे यांचे पॅनल तयार करून सातपूर विकास आघाडी स्थापन केलेली होती. या आघाडीतील दीक्षा लोंढे विजयी झाल्या आहेत. तर नितीन निगळ यांनी पहिल्या दोन फेरीत आघाडी घेत स्थायी सभापती सलीम शेख यांना पिछाडीवर टाकले होते. मात्र पुढील दोन फेऱ्यात सलीम शेख यांनी मोठी आघाडी घेतल्याने नितीन निगळ तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर सातपूर विकास आघाडीचे उमेदवार अमित मांडवे यांनीदेखील पहिल्या फेरीत आघाडी घेतली होती. त्यांनी मनसेचे योगेश शेवरे यांना मागे टाकले होते. मात्र पुढील दोन फेरीत शेवरे यांनी मोठी आघाडी घेतल्याने मांडवे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.
लोंढे यांना पराभवाचा धक्का
सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत नवीन प्रभाग आरक्षणाचा फटका रिपाइंचे विद्यमान नगरसेवक प्रकाश लोंढे यांना बसला. सतत २0 वर्षे नगरसेवक राहिलेल्या लोंढे यांना प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक लढवावी लागली. नगरसेवक दिनकर पाटील यांनी पॅनलमध्ये घेण्यास तीव्र विरोध केल्याने लोंढे यांनी अपक्ष निवडणूक लढविली. मात्र प्रभाग क्रमांक ९ मधील मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.
पॅनलचे सूत्रधार
सातपूर विभागातील चार प्रभागांमध्ये चार विद्यमान नगरसेवकांनी पॅनलचे नेतृत्व केले. प्रभाग ८ मध्ये नगरसेवक विलास शिंदे यांनी शिवसेनेच्या पॅनलचे नेतृत्व केले आणि पूर्ण पॅनल निवडून आले. प्रभाग क्रमांक १0 मध्ये नगरसेवक शशिकांत जाधव यांनी भाजपाच्या पॅनलचे नेतृत्व केले आणि पूर्ण पॅनल निवडून आणले. प्रभाग क्रमांक ११ मध्ये स्थायी सभापती सलीम शेख यांनी मनसेच्या पॅनलचे नेतृत्व केले. मात्र पॅनलमधील दोनच उमेदवार विजयी झाले आहेत.
विलास शिंदे यांचा सहज विजय
प्रभाग क्रमांक ८ मध्ये विद्यमान नगरसेवक विलास शिंदे यांना शह देण्यासाठी विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील यांनी आपले पुत्र अमोल पाटील यांना मैदानात उतरविले होते आणि शिंदे यांच्या विरोधात व्यूहरचनादेखील केली होती. मात्र शिंदे यांनी भरघोस मत मिळवित सहज विजय संपादन केला आणि पूर्ण पॅनल निवडून आणले.
बेंडकोळी कुटुंबीय रिंगणात
प्रभाग क्रमांक ८ मधील अनुसूचित जमाती महिला गटात माजी नगरसेवक उषा बेंडकोळी (अपक्ष), विद्यमान नगरसेवक रेखा बेंडकोळी (भाजपा) आणि राधा बेंडकोळी (शिवसेना) आदि बेंडकोळी कुटुंबीय निवडणूक रिंगणात होते. शिवसेनेच्या राधा बेंडकोळी यांनी दोन्ही प्रतिस्पर्धी माजी नगरसेवकांचा पराभव केला आहे.
काकांचा विजय
प्रभाग क्रमांक ९ मध्ये विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील यांच्या विरोधात माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील निवडणूक रिंगणात उतरले. काका पुतण्याच्या लढाईत काका दिनकर पाटील यांनी सहज विजय संपादन केला. पुतण्या प्रेम पाटील यांचा पराभव केला. काका पुतण्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. प्रेम पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.४दीक्षा लोंढे यांनी शिवसेनेच्या रूपाली गांगुर्डे, विद्यमान स्थायी सभापती मनसेच्या सविता काळे, माकपाच्या सिंधू शार्दुल, माजी नगरसेवक ज्योती शिंदे यांच्यासह १० उमेदवारांचा पराभव केला.
सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेच्या सीमा निगळ यांनी माजी नगरसेवक बसपच्या सुजाता काळे, भाजपाच्या माधुरी काळे, मनसेच्या अलका निगळ, माकपाच्या मंगल पाटील, राष्ट्रवादीच्या स्वाती माने, सातपूर विकास आघाडीच्या जयश्री धोत्रे यांच्यासह ११ उमेदवार पराभूत झाले आहेत.