नाशिकमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा
By Admin | Updated: April 4, 2015 01:19 IST2015-04-04T01:18:55+5:302015-04-04T01:19:21+5:30
नाशिकमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा

नाशिकमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धा
नाशिक : उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वतीने अधिकृत मानांकन टेनिस स्पर्धा नाशिकमध्ये होणार आहेत. येत्या ८ ते १७ मे दरम्यान या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, त्यात अनेक आंतरराष्ट्रीय गाजलेले खेळाडू सहभागी होणार आहेत. नाशिकच्या निवेक या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरविण्याचा मान मिळाला आहे. महिलांच्या मानांकन स्पर्धा भरविण्याची संधी निवेकला मिळाली आहे. या स्पर्धेत भारतातील खेळाडूंव्यतिरिक्त अमेरिका, आॅस्ट्रेलिया, ब्रिटन, रशिया, चीन, जपान, फ्रान्स, सार्बिया, युक्रेन, स्पेन, हंगेरी, सिंगापूर, थायलंड, ब्राझील या देशांतील खेळाडंूनी सहभागी होण्याची तयारी दर्शाविली असून, त्यांनी आपल्या प्रवेशिका आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या लंडन येथील कार्यालयात दिल्या आहेत. अंतिम अव्वल ६४ खेळाडूंना या स्पर्धेकरिता प्रवेश मिळणार आहे. पात्र खेळाडूंची यादी २० एप्रिल रोजी जाहीर होईल. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना दहा हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीसही मिळणार आहे. याशिवाय ग्रॅँड स्लॅम स्पर्धा म्हणजेच अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, आॅस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन या स्पर्धेस पात्र होण्याकरिता आवश्यक असलेल्या गुणांची कमाई या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या निवेकच्या टेनिस कोर्टवर ८ ते १७ मे दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना नामवंत खेळाडूंचे खेळ पाहण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती निवेकचे अध्यक्ष संदीप सोनार, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, सचिव राजकुमार जॉली आणि स्पर्धा संयोजक राकेश पाटील यांनी केली.