कालिका यात्रोत्सवात स्टॉल्ससाठी प्रथमच लिलाव
By Admin | Updated: October 6, 2015 23:44 IST2015-10-06T23:43:04+5:302015-10-06T23:44:57+5:30
मक्तेदारी मोडीत : ठरावावरून मनसे-भाजपात धुमस

कालिका यात्रोत्सवात स्टॉल्ससाठी प्रथमच लिलाव
नाशिक : ग्रामदेवता कालिका मातेचा यात्रोत्सव दि. १३ ते २२ आॅक्टोबर रोजी साजरा होणार असून, यंदा यात्रोत्सवातील विविध व्यावसायिक स्टॉल्ससाठी महापालिकेने प्रथमच जाहीर लिलाव पद्धत अवलंबिली आहे. या लिलाव प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षापासून एकाच विशिष्ट मंडळाकडे ठेका देण्याची पद्धत आणि मक्तेदारी मोडून निघणार आहे.
दरम्यान, व्यावसायिक स्टॉल्सच्या ठरावावरून सत्ताधारी मनसे आणि भाजपात जुंपल्याने अखेर प्रशासनाने जाहीर लिलावाचा मार्ग स्वीकारला असून, येत्या शुक्रवारी (दि.९) राजीव गांधीभवनमध्ये सदर लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
नवरात्रोत्सवात कालिका मातेची यात्रा भरत असते. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक खाद्यपदार्थ, शीतपेये, पूजासाहित्य, खेळणी, कॉस्मेटिक्स आदि स्टॉल्स उभारले जातात.