गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून अनेक बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत महिला आर्थिक सशक्तीकरणासाठी बळकटी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाडळी देशमुख येथे इगतपुरी पंचायत समितीच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत मुद्रा स्वयंसहायता महिला समूहाच्या रणरागिनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकत व्यवसायाचे पहिलेच भरघोस उत्पादन घेत व्यवसायाकडे झेप घेतली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला बचत गटातील महिलांना व्यवसाय करण्याविषयी मार्गदर्शन केले जात यामध्ये तालुक्यातील अनेक महिला बचत गटातील महिलांनी व्यवसायाची सुरूवात करत महिलांना आधार दिला आहे. इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील मुद्रा स्वयंसहायता महिला समूहाच्या महिलांनी देखील व्यवसायाकडे आपले पहिले पाऊल टाकले असून कल्पतरू फाउंडेशनचे व्यवस्थापक निळकंठेश्वर, सागर पांडे, बिरेंद्र रॉय यांनी सदर बचत गटाकडे ६५० किलो रव्याच्या लाडूची मागणी केली होती. या पहिल्याच मागणीमुळे बचत गटातील महिलांना आनंद झाला.
बचत गटाच्या अध्यक्ष शोभा धांडे यांनी बैठक घेत सदर मागणी लवकर पूर्ण करण्याविषयी सदस्य महिलांशी चर्चा केली, आणि दोनच दिवसांत मागणी पूर्ण करण्यात येऊन ६५० किलो रव्याचे लाडू सुपूर्द करण्यात आले. यासाठी पंचायत समितीचे अधिकारी मिलिंद अडसुळे, श्रीमती वाघ व भगवान आवारी यांचे सहकार्य लाभले.
यासाठी सचिव ललिता आमले, मुक्ता धांडे, मंदाबाई धांडे, अलका धांडे, मीरा चारस्कर, योगिता धांडे, बबाबाई धांडे, संगीता धांडे आदी बचत गटातील महिलांनी परिश्रम घेतले.
पूर्वी महिलांना चूल आणि मूल यामध्ये गुरफटून रहावे लागत असे. मात्र आता महिला एकत्र येऊन बचत गटाद्वारे एखाद्या उद्योगाची स्थापना करून स्वयंरोजगाराची निर्मिती करत आहेत. त्यातून स्वतः व कुटुंबाचे आर्थिक सशक्तीकरण होण्यास मदत मिळत आहे.
- शोभा धांडे, अध्यक्ष, मुद्रा महिला स्वयंसहायता समूह. पाडळी देशमुख.
(१८पाडळी देशमुख)
पाडळी देशमुख येथील बचत गटातील महिला शोभा धांडे, मंदाबाई धांडे, योगिता धांडे व इतर लाडू बनवताना.
180921\18nsk_18_18092021_13.jpg
पाडळी देशमुख येथील बचत गटातील महिला शोभा धांडे, मंदाबाई धांडे, योगिता धांडे व इतर लाडू बनवताना.