जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प
By Admin | Updated: April 3, 2015 01:46 IST2015-04-03T01:45:45+5:302015-04-03T01:46:22+5:30
जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प
नाशिक : राजकारणात कोणतीही आश्वासने देऊन सत्तेवर येणे सोपे असते, मात्र पूर्ण करणे किती अवघड असते, हे आजच्या राज्य व केंद्रातील सरकारला आता कळाले असेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
येथील रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन व जैन सेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बाळासाहेब थोरात यांनी, ‘राज्यातील आजवर झालेले मुख्यमंत्री व त्यांच्या पुढील आव्हाने’ या विषयावर मुक्तचिंतन व्याख्यान दिले. बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाणांपासून ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना, प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या स्वभावातील गुणवैशिष्ट्ये व त्यांच्या काळातील त्यांच्यापुढील आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शंकरराव चव्हाण यांनी राज्यात धरणे बांधण्यासाठी प्राधान्य दिले. शरद पवार यांना राज्याची दिशा माहीत होती आणि त्यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून गाजले. त्यांच्या काळात गुंडगिरी मोडीत निघाली.वसंतदादा पाटील कमी शिकलेले, मात्र दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री होते.
शिवाजीराव निलंगेकर, सुधाकर नाईक, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत त्यांनी त्या त्या काळातील आव्हाने सांगितली. आताच्या सरकारने लोकांच्या अपेक्षा खूपच वाढवून ठेवल्या, मात्र त्या पूर्ण करणे किती अवघड आहे, याची प्रचिती त्यांना येत आहे, असे थोरात यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, प्रवीण खाबिया, सुनील बुरड, मोहनलाल लोढा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)