पहिले ‘आप’ करता करता इच्छुकांना ‘ताप’
By Admin | Updated: January 31, 2017 00:43 IST2017-01-31T00:43:33+5:302017-01-31T00:43:50+5:30
उमेदवारी याद्या रखडल्या : इच्छुकांना थोपविण्यासाठी राजकीय पक्षांच्या व्यूहरचना

पहिले ‘आप’ करता करता इच्छुकांना ‘ताप’
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडे वाढलेली इच्छुकांची संख्या आणि ती न मिळाल्यास अन्य पक्षांना जाऊन मिळण्याची भीती यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिस्पर्धी पक्षांनी उमेदवारी घोषित केल्यानंतरच आपला पक्ष उमेदवारी यादी घोषित करेल, अशी भूमिका घेतली आहे. पहिले ‘आप’च्या या भूमिकेमुळे इच्छुकांच्या डोक्याला ताप झाला आहे. उमेदवारी घोषित होत नाही आणि त्यामुळे नीट भूमिका घेता येत नाही, अशी दावेदारांची स्थिती झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन किमान आठ दिवस झाले आहेत. मात्र आता युती होते की आघाडी या घोळात प्रमुख पक्षांनी इच्छुकांचा जीव टांगणीला लावला आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होणार नाही, हे भाजपाने १७ जानेवारीलाच स्पष्ट केले होते. तरीही मुंबईत सेना- भाजपा युतीच्या चर्चा झाल्यानंतर कदाचित नाशिकला युती होईल, अशी शक्यता वाटत होती. परंतु आता ती मावळली आहे. भाजपाने अंतर्गत बैठकांच्या अनेक फेऱ्या केल्यानंतरही २७ तारखेला पहिली यादी घोषित करण्याचा मुहूर्त टळला आहे. शिवसेनेने मुलाखती घेऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही संपर्क प्रमुखांनी आणखी दोन दिवसांनी यादी घोषित करण्यात येईल, असे सांगून उमेदवारी जाहीर करणे लांबवले आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून, केवळ तीन ते चार प्रभागात अडकलेली आघाडी आता अन्य पक्षांतील सक्षम उमेदवारांच्या प्रतीक्षेत आहे. महापालिकेत सर्वाधिक गळती लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेदेखील अशाच प्रकारे यादी टाळली आहे. सोमवारी राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर यादी घोषित करण्यात येईल, असे सांगणाऱ्या यादीचे नाव काढले नाही. आपल्या पक्षाची यादी घोषित केल्यानंतर त्यातल्या त्यात स्पर्धेतील ज्या इच्छुकांना संधी मिळणार नाही, ते अन्य पक्षांच्या गळाला लागण्याची शक्यता असून, ते टाळण्यासाठीच याद्या थांबविल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या इच्छुकांना स्पर्धा नाही, अशांनादेखील यामुळे थांबवावे लागले आहे. परंतु दोलायमान असलेल्या इच्छुक उमेदवारांची पंचाईत होणार आहे. (प्रतिनिधी)