पंचवटीतील कुमावतनगरमध्ये गोळीबार
By Admin | Updated: November 6, 2015 23:43 IST2015-11-06T23:41:07+5:302015-11-06T23:43:15+5:30
नागरिक भयभीत : तिसरी घटना

पंचवटीतील कुमावतनगरमध्ये गोळीबार
पंचवटी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील सराईत गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे़ गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या वादातून चौघा संशयितांनी हवेत गोळीबार केल्याची घटना पेठरोडवरील कुमावतनगरमध्ये घडली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २५ आॅक्टोबरला हिरावाडीत दोन गटांमध्ये वाद होऊन त्यांनी गोळीबार केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती़ मात्र, पंचवटी पोलिसांनी गोळीबार झाला नसल्याचे सांगितले होते़
अशोक ऊर्फ नाना मुरलीधर कारवाल (वय ३७, रा. कुमावतनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी संशयित योगेश दत्तू क्षीरसागर (रा. म्हसोबानगर), दीपक (पूर्ण नाव नाही) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. कारवाल व क्षीरसागर यांच्यामध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या वादातून कारवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता़ तेव्हापासून हे वाद सुरूच होते़
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कारवाल पत्नीसमवेत घराबाहेर उभे असताना संशयित योगेश व दीपक यासह त्यांचे साथीदार तिथे आले व त्यांनी कारवाल यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत निघून गेले.दरम्यान,हा प्रकार कारवाल यांनी माजी नगरसेवक कमलेश बोडके यांना सांगितल्यानंतर ते कुमावतनगरला आले व दोघांमधील वाद मिटविण्यासाठी संशयिताना बोलावून घेतले़ यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयित क्षीरसागर, दीपक हे आपल्या दोन साथीदारांसह सिल्व्हर रंगाच्या इंडिका गाडीतून आले. यावेळी कमलेश बोडके यांनी दोघांना समोरासमोर आणून त्यांच्यातील वाद मिटवून दिले; मात्र या सर्व प्रकारानंतर योगेश क्षीरसागर हा त्याच्या साथीदारांसमवेत इंडिका गाडीतून जात असताना त्याने अचानकपणे त्याच्या जवळील गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार करून पलायन केले. यामुळे परिसरात घबराट पसरली होती़ (वार्ताहर)
पंचवटीत गोळीबाराच्या तीन घटना
- गत महिनाभरात आडगाव व पंचवटी परिसरात हवेत गोळीबाराची ही तिसरी घटना आहे़ पहिली घटना धात्रकफाटा परिसरात घडली असून एका व्यावसायिकाकडील रोकड लुटण्यासाठी गोळीबार करून पलायन केल्याची घटना घडली होती़. या घटनेत संबंधित व्यावसायिक जखमीही झाला होता़
- दुसरी गोळीबाराची घटना हिरावाडीत परिसरात दोन गटांमधील वादामुळे झाली; मात्र या घटनेचा पोलिसांनी इन्कार केला होता़ .
- तिसरी गोळीबाराची घटना कुमावतनगरमध्ये गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़