खुल्या मैदानांमध्येच होणार फटाके विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:08 IST2017-10-05T16:06:14+5:302017-10-05T16:08:46+5:30

Fireworks will be sold in open grounds | खुल्या मैदानांमध्येच होणार फटाके विक्री

खुल्या मैदानांमध्येच होणार फटाके विक्री

ठळक मुद्देविनापरवानगी गाळे उभारल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार महापालिकेने ठिकठिकाणी गाळ्यांना परवानगी न देता केवळ खुल्या मैदानांवरच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी लिलाव प्रक्रिया राबविली जाणार


नाशिक : मागील वर्षी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर फटाक्यांच्या गाळ्यांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सावधगिरी म्हणून महापालिकेने यावर्षी खुल्या मैदानांमध्येच फटाके विक्रीसाठी परवानगी देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी एक मैदान निश्चित करण्यात आले असून, २६५ गाळ्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ९) लिलावप्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, निश्चित केलेल्या मैदानांव्यतिरिक्त अन्यत्र गल्लीबोळात कुठेही फटाके विक्रीसाठी गाळे उभारणीस परवानगी नाकारण्यात येणार आहे. कुणी विनापरवानगी गाळे उभारल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मागील वर्षी ऐन दिवाळीत औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर थाटण्यात आलेल्या फटाक्यांच्या गाळ्यांना भीषण आग लागली होती. सुदैवाने त्यात जीवित हानी झाली नसली तरी वित्तीय नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते. औरंगाबाद येथील दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेने मागील वर्षीच नियमांचे उल्लंघन करणाºया फटाके विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर, महापालिकेच्या अग्निशमन विभागाने नव्याने नियमावलीही तयार केली. यंदा, त्याच नियमावलीचा आधार घेत महापालिकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रीसाठी गाळ्यांना परवानगी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. मागील वर्षी महापालिकेने शहरात ठिकठिकाणी ३८९ गाळ्यांसाठी लिलावप्रक्रिया राबवली होती. त्यापैकी १९३ गाळ्यांना प्रतिसाद मिळून महापालिकेला गाळेविक्रीतून तब्बल ५४ लाख ७७ हजार रुपयांची कमाई झाली होती. यंदा मात्र, महापालिकेने ठिकठिकाणी गाळ्यांना परवानगी न देता केवळ खुल्या मैदानांवरच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सहाही विभागीय अधिकाºयांकडून मैदानांची माहिती मागविण्यात आली होती. त्यातील, पूर्व विभागात राणेनगरातील शारदा विद्यालयासमोरील मोकळ्या जागेत एकूण १५ गाळे, पश्चिम विभागात इदगाह मैदानावर ५० गाळे, पंचवटी विभागात तपोवनातील साधुग्राम कार्यालयासमोरील जागेत ५० गाळे, नाशिकरोड विभागात नाशिक-पुणा रोडवरील चेहेडी येथील ट्रक टर्मिनसच्या जागेत ४० गाळे, सातपूर विभागात क्लब हाउसच्या जागेत ५० गाळे तर सिडको विभागात राजे संभाजी स्टेडियमच्या जागेत ५० गाळे याप्रमाणे एकूण २६५ गाळ्यांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. या गाळ्यांसाठी आता येत्या सोमवारी लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. यंदा सुरक्षिततेच्या दृष्टीने खुल्या मैदानांमध्येच फटाके विक्री व्हावी, अशी ठाम भूमिका महापालिकेने घेतली असून, विनापरवानगी गाळे उभारणाºयांवर सक्त कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Fireworks will be sold in open grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.