आरटीओ रेकॉर्ड रूमला आग

By Admin | Updated: March 3, 2015 00:30 IST2015-03-03T00:30:26+5:302015-03-03T00:30:44+5:30

शॉर्टसर्किटचा अंदाज : कागदपत्रे, साहित्य जळाले; जीवितहानी नाही

Fire in the RTO record room | आरटीओ रेकॉर्ड रूमला आग

आरटीओ रेकॉर्ड रूमला आग

पंचवटी : पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमला सोमवारी सकाळी अचानक आग लागली़ या आगीत रेकॉर्ड रूममधील काही कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशामक दलाच्या तीन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले़ दरम्यान, शॉॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तविली.
सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास कार्यालयातील रेकॉर्ड रूममधून धूर निघत असल्याचे कार्यालयातील शिपाई बाळू पानसरे यांच्या लक्षात आले़ त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती कळविल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली़ तसेच रेकॉर्ड रूमच्या काचा फोडून आगीवर पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली़ सुमारे दीड तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात या विभागाला यश आले़ या खोलीमध्ये मॅन्युअल रेकार्ड ठेवलेले होते. या आगीमध्ये फायलिंगचे कागदपत्रे जळाली असून, त्यामध्ये २०१२-२०१३ मध्ये वाटप केलेल्या लायसन्सचे कागदपत्रे, कार्यालयातील कपाट, खुर्च्या, फर्निचर व संगणकाचे नुकसान झाले़
या आगीमुळे अग्निशामक दलाच्या जवानांनी संपूर्ण कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला होता़ त्यामुळे काहीकाळ कागदपत्रे नोंदणीची कामे रखडली होती़ रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो आहे़ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मंडोरा, अविनाश राऊत, सुदाम वाघमारे यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती़
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही़ कार्यालयीन कामकाजाच्या वेळी ही आग लागली असती तर कदाचित मोठी जीवित वा वित्तहानी झाली असती अशी चर्चा यावेळी सुरू होती़ (वार्ताहर)

Web Title: Fire in the RTO record room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.