गंजमाळजवळील भंगार दुकानाला आग
By Admin | Updated: November 15, 2015 23:59 IST2015-11-15T23:58:57+5:302015-11-15T23:59:39+5:30
सुदैवाने जीवितहानी नाही : गॅस गुदाम थोडक्यात बचावले

गंजमाळजवळील भंगार दुकानाला आग
गंजमाळजवळील भंगार दुकानाला आगसुदैवाने जीवितहानी नाही : गॅस गुदाम थोडक्यात बचावलेनाशिक : गंजमाळमधील एका भंगार दुकानाला रविवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली़ दुकानातील भंगारच्या वस्तूंनी पेट घेतल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले़ सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच बंबांच्या साहाय्याने दोन तासांचे अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले़ दरम्यान, या दुकानाशेजारी असलेले मयूर गॅस एजन्सीचे गुदाम थोडक्यात बचावले असून, त्याने पेट घेतला असता तर मोठी हानी झाली असती़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंजमाळ परिसरामध्ये कुतुबुद्दीन शेख यांचे भंगारचे दुकान आहे़ रविवारी (दि़१४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली़ या दुकानामध्ये पुठ्ठे, प्लास्टिकच्या बाटल्या, कागदे, तसेच भंगारच्या वस्तू असल्याने त्यांनी त्वरित पेट घेतला़ थोड्याच वेळात या आगीने रौद्र रूप धारण केले़ या गुदामाशेजारील दाटीवाटीने असलेल्या घरांमधील नागरिकांच्या आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला फोन करून घटनेची माहिती दिली़
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन, स्टेशन आॅफिसर पी़ व्ही़ तिडके, सब आॅफिसर डी़ बी़ गायकवाड, जे. एस. अहिरे, लिडिंग फायरमन डी़ ए़ चंद्रमोरे, फायरमन आऱ आऱ पवार, व्ही़ जी़ नागपुरे, आऱ एस़ नाकील, एस़ एस. आगलावे हे बंबांसह घटनास्थळी पोहोचले़ शिंगाडा तलावातील तीन, सिडकोतील एक व पंचवटीतील एक अशा पाच बंबांच्या साहाय्याने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली़
गंजमाळच्या ज्या भंगार दुकानाला आग लागली त्याच्या शेजारीच मयूर गॅस एजन्सी असून, त्यामध्ये भरलेले सिलिंडर ठेवलेल्या बाजूलाच एलपीजी गॅस सिलिंडरचे गुदाम होते़ त्यास आग लागली असती तर संपूर्ण पंचशीलनगर उद्ध्वस्त झाले असते़ या आगीचे कारण समजू शकले नसून स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी विशेष प्रयत्न केले़ दरम्यान, या घटनेची भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)