ब्रिटिशकालीन बंगल्याला आग

By Admin | Updated: July 30, 2014 00:17 IST2014-07-29T23:50:40+5:302014-07-30T00:17:58+5:30

दीपक महल : वरचा मजला बेचिराख

Fire in the British time | ब्रिटिशकालीन बंगल्याला आग

ब्रिटिशकालीन बंगल्याला आग

देवळाली कॅम्प : लॅमरोडवरील शिवानंदा कंपनीचे मालक व दानशूर एम. के. बिरमानी महाराज यांच्या ब्रिटिशकालीन दीपक महल बंगल्याच्या वरच्या मजल्यास आज सकाळी आग लागल्याने संपूर्ण मजला बेचिराख होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
लॅमरोड संसरी नाक्याजवळ उद्योजक बिरमानी यांचा ब्रिटिशकालीन बंगला असून तो पूर्णत: शिसम व सागवानी लाकडात आहे. आज सकाळी कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या अजय थापर यांच्याकडे आलेल्या कामगारांना बंगल्याच्या वरच्या मजल्यावरून धूर येताना दिसला. त्यांनी त्वरित तेथे काम करणाऱ्या कामगारांना आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र लाकडी बंगला असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. पाऊस पडत असतानासुद्धा आगीचे लोळ आकाशाकडे उठत होते. आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी तातडीने छावणी परिषद अग्निशामक दल, मनपा अग्निशामक दलाच्या बंबांना घटनास्थळी पाचारण केले. मात्र तरीदेखील आग आटोक्यात येत नव्हती. स्कूल आॅफ आर्टिलरीमधील १२० मीटरवर पाण्याचा मारा करणारी सर्च फायर फायटर गाडीलाही पाचारण करण्यात आले. तब्बल अडीच-तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.
आग लागली तेव्हा पावसाला सुरुवात होत होती. पाऊस नसता तर ब्रिटिशकालीन हा लाकडी बंगला पूर्णपणे खाक झाला असता. अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून विझविली. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती. (वार्ताहर)

Web Title: Fire in the British time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.