औद्योगिक वसाहतीत अग्निशमन सेवा सुरू होणार
By Admin | Updated: November 17, 2016 22:21 IST2016-11-17T22:17:29+5:302016-11-17T22:21:33+5:30
अंबड येथे सुविधा : आयमाच्या प्रयत्नांना यश

औद्योगिक वसाहतीत अग्निशमन सेवा सुरू होणार
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अनेक कंपन्यांना मोठ्या आगी लागून उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याने अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (आयमा) वतीने अंबड औद्योगिक वसाहतीत अग्निशमन सेवा सुरू करण्याची वारंवार मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच अंबड औद्योगिक वसाहतीत अग्निशमन सेवा सुरू होणार आहे.
उद्योजकांचे होणारे नुकसान टाळता यावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे व जिल्हा उद्योगमित्र केंद्राच्या बैठकीत वारंवार याप्रश्नी मुद्दा उपस्थित करून सतत पाठपुरावा केला होता. परंतु अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम झाले नसल्यामुळे अग्निशमन केंद्र सुरू झाले नव्हते. या जागेवर अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात यावे व अग्निशमन सेवा सुरू व्हावी यासाठी आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आयमाच्या शिष्टमंडळाने एमआयडीच्या अधिकाऱ्यांशी मागच्या आठवड्यात सविस्तर चर्चा केली होती. या इमारतीचे बांधकाम लगेच सुरू होणार असून, हे केंद्र लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती नितीन वानखेडे यांनी आयमाच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी आयमाचे सरचिटणीस निखिल पांचाल, दिलीप वाघ, राजेंद्र कोठवदे, कैलास आहेर आदि उद्योजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)