अस्वच्छता करणाऱ्यांकडून तब्बल दोन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:38+5:302021-02-05T05:42:38+5:30
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिकेच्यावतीने जेारदार तयारी सुरू असून आता अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास वेग आला आहे. ...

अस्वच्छता करणाऱ्यांकडून तब्बल दोन लाखांचा दंड वसूल
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिकेच्यावतीने जेारदार तयारी सुरू असून आता अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास वेग आला आहे. १५ ते २१ जानेवारी दरम्यान महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी अस्वच्छता करण्याबरोबरच आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१६ जणांकडून तब्बल २ लाख ४ हजार १८० रूपये वसूल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक कारवाया मास्क न वापरणाऱ्यांवर करण्यात आल्या आहेत. यात ३६ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ हजार २०० रूपयांचा दंंड वसूल करण्यात आला आहे. तर प्रतिबंधित प्लास्टीक वापरल्याप्रकरणी १३ जणांकडून ६५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. घंटागाडीत कचरा देताना त्यात ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण न केल्याबद्दल ९१ जणांवर दंडात्मक कारवाई करून ३० हजार ३०० रूपये वसूल करण्यात आले आहेत. तर एकदा अशाप्रकारे दंड केल्यानंतर देखील पुन्हा कचरा वर्गीकरण न केल्याबद्दल एका व्यक्तीकडून पाच हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पालापाचोळा जाळल्याबद्दल दोन जणांकडून १५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून पाच जणांकडून पाच हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोकळ्या भूखंडांवर डेब्रीज साहित्य टाकल्याप्रकरणी १५ जणांकडून १३ हजार ८०० रूपये युजर चार्जेस तर ७ जणांकडून १४ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांकडून २७ हजार ४०० रूपये तर नदी नाल्यात कचरा टाकणाऱ्या आठ जणांकडून २ हजार ८०० रूपये, रस्यावर कचरा टाकल्याप्रकरणी ९ जणांकडून ११ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. पाळीव प्राण्यांनी अस्वच्छता केल्या प्रकरणी ५ हजार ७८० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
इन्फो...
दंडामुळे महापालिका मालामाल
स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिकेच्यावतीने एप्रिलपासून जोरदार कारवाई करण्यात येत असून आत्तापर्यंत ६ हजार ५३ प्रकरणात ३४ लाख ३३ हजार ६१० रूपये वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.