कर्तबगारी, परंतु वादग्रस्तही

By Admin | Updated: February 15, 2017 00:13 IST2017-02-15T00:13:16+5:302017-02-15T00:13:32+5:30

कर्तबगारी, परंतु वादग्रस्तही

Fine, but controversial | कर्तबगारी, परंतु वादग्रस्तही

कर्तबगारी, परंतु वादग्रस्तही

इतिहास चाळताना
महापालिकेच्या पहिल्या महिला महापौरपदाचा बहुमान डॉ. शोभा बच्छाव यांना मिळाला. त्यांच्या कारकिर्दीत अनेक विषयांना मुहूर्त लाभला काही भूमिपूजन, तर काही उद््घाटने झाली. त्यात फाळके स्मारकाचे उद््घाटन हा प्रमुख एक भाग होता. नाशिककरांसाठी पहिला बॉलिवूड स्टार शो यानिमित्ताने पहायला मिळाला. अर्थात, त्यावेळी गृहमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी स्वारस्य घेतले होते. त्याचबरोबर थेट जलवाहिनीचे लोकार्पण झाले. १४ पूल मंजूर झाले तसेच यशवंतराव स्मृती तारांगणाचे भूमिपूजन अशा अनेक गोष्टी झाल्या. अर्थात, कामे होत राहिली तरी त्या काळात वादग्रस्त कामे झाल्याने त्यापासून त्या वाचल्या नाहीत. विकास आराखड्यातील आरक्षणे बदलणे विशेषत: जुन्या पोलीस आयुक्तालयाचा झोन बदलणे अशा अनेक मुद्द्यांवरून त्या वादग्रस्त ठरल्या. त्यावेळी जागरूक नागरिकांनी आरक्षण हटविण्याच्या विरोधात काढलेला मोर्चा हा लक्ष्यवेधी ठरला. महापालिकेच्या अंदाजपत्रकात महापौर आश्वासन निधी नावाचा अजब प्रकार त्यावेळी बच्छाव यांच्या कारकिर्दीतच झाला. महापालिकेची शेकडो एकर जमीन विशेषत: बेघरांसाठी घरांचे आरक्षण असलेली जमीन म्हाडाच्या अख्त्यारित परस्पर वर्ग केल्याने त्यावेळच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालक प्रतिभा भदाणे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. दूषित पाण्याचा पुरवठा होतो, म्हणून दोष शोधून शुद्ध पाणीपुरवठा करण्याऐवजी पाणी शुद्धीकरणासाठी औषधी ट्यूबची खरेदी हा विषय सभागृहात गाजला, असे विषय गाजले. नोकरभरती हा विषय तर कहर होता. तीन नगरसेवक मिळून एक अभियंता असा भरतीचा अजब कोटा त्यावेळी निघाला. तसेच नोकरभरतीत इतकी वशिलेबाजी झाली की एका आध्यात्मिक गुरूनेदेखील भरती मोहिमेत हात धुवून घेतल्याची चर्चा झाली होती. केवळ बच्छाव यांच्या काळात हे विषय गाजले असले तरी त्यातून प्रशासनाचे अनेक अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. तत्कालीन महिला आयुक्त सुजाता सौनिक त्याला अपवाद ठरल्या नाहीत. महापालिकेच्या आयुक्तपदी कृष्णकांत भोगे यांची नियुक्ती झाली आणि अनेक विषयांना चाप बसला.  - संजय पाठक

Web Title: Fine, but controversial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.