महावितरणच्या मुख्य कार्यालयात कार्यरत वित्त व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील बदलीसंदर्भात दैनिकांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तांचा हवाला देत वीज कामगार फेडरेशनने यासंदर्भात व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मुख्य कार्यालयात कार्यरत वित्त व लेखा विभागातील वरिष्ठ व्यवस्थापक व त्यावरील अनेक अधिकारी हे पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ किंवा २००५ नंतर निर्माण झालेल्या महावितरण कंपनीत नोकरीवर रुजू झाल्यापासून आजतागायत तिथेच कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांपैकी महाव्यवस्थापक पदावरील जवळ जवळ सर्वच अधिकारी हे २०२५ ते २०३० च्या दरम्यान महावितरणच्या सेवेतून निवृत्त होतील. यातील अनेक अधिकारी हे १९९८ च्या दरम्यान उपव्यवस्थापक या पदी नोकरीवर रुजू झाले असून, गेल्या २३ वर्षात त्यांची एकतर मुख्य कार्यालयाच्या बाहेर बदलीच झाली नाही किंवा फार फार तर केवळ १ ते २ वर्षे इतकाच त्यांचा मुख्य कार्यालयाबाहेर सेवाकाळ आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे दरम्यानच्या काळात त्यांना चार चार पदोन्नतीदेखील मिळाल्या आहेत. बदली संदर्भातील परिपत्रकात कार्यकारी अभियंता तत्सम व त्यावरील अधिकाऱ्यांची एका ठिकाणी ३ वर्ष सेवा काळानंतर परिमंडळाबाहेर बदली करण्याचे अगदी स्वच्छ व स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य कार्यालयाचे बदली कारणाने इतके स्पष्ट निर्देश असतानादेखील स्वतः प्रशासन आपल्याच निर्देशांशी प्रतारणा करीत आहेत. मुख्य कार्यालयानेच जारी केलेल्या परिपत्रकातील तरतुदींची मुख्य कार्यालयच पायमल्ली करत आहे. महावितरण कंपनी ही महाराष्ट्र शासनाची उपक्रम असलेली संस्था असून, ती कुणाचीही खासगी मालमत्ता व जहागीर नाही. त्यामुळे महावितरण कंपनीस महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे वाटचाल करणे क्रमप्राप्त असून, वित्त व लेखा विभागाच्या कार्यकारी संचालिका हे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची पाठराखण करीत असून, १५ ते २३ वर्षांपासून मुख्य कार्यालयात तळ ठोकणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होण्याचा प्रयत्न ते हाणून पाडत आहेत. यातील एक मुख्य महाव्यवस्थापक तर २०२५ ला सेवानिवृत्त होत असून, या विभुतीने सन १९९२ मध्ये नोकरीवर रुजू झाल्यापासून एकही दिवस मुख्य कार्यालयाच्या बाहेर कामच केलेले नाही. त्यामुळे मुख्यालयात तळ ठाेकून बसलेल्यांची इतरत्र बदली करावी व मुख्य कार्यालयाच्या बाहेरील बदलीपात्र अधिकाऱ्यांची तातडीने इच्छित ठिकाणी बदली करावी, अन्यथा महावितरण कंपनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे मुख्य सचिव प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे.
महावितरणमध्ये ठाण मांडलेल्यांचा शोध घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST