नंदिनीच्या निमित्ताने विनोदचा शोध व्हावा
By Admin | Updated: December 8, 2015 00:23 IST2015-12-08T00:22:38+5:302015-12-08T00:23:46+5:30
मातृत्वासाठी अपहरण की ‘स्पा’साठी वारस?पोलीस यंत्रणेसमोर आव्हान

नंदिनीच्या निमित्ताने विनोदचा शोध व्हावा
नाशिक : मूलबाळ होत नाही या कारणावरून साडेचार वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणी अटकेत असलेल्या शिवदास सातपुते याच्यावर यापूर्वीही विनोद आव्हाड या तरुणाच्या अपहरण घटनेत संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल असून, दोन वर्षे उलटूनही विनोदचा शोध लागलेला नाही हे विशेष, त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यात योगायोगानेच (?) दुसऱ्यांदा जेरबंद झालेल्या सातपुतेच्या चौकशीत बेपत्ता विनोदचा शोध घेण्याबरोबर बालिकेचे अपहरण नेमके मातृत्वासाठी होते की गुन्हेगारी पोसणाऱ्या ‘स्पा’च्या वारसासाठी याचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
नंदिनी राजेंद्र शर्मा या साडेचार वर्षीय बालिकेचे अपहरण प्रकरणाने चर्चेत आलेले शिवदास सातपुते व त्याची कथित पत्नी विद्या यांच्या पूर्वेतिहासावर उलट-सुलट चर्चा झडू लागली असून, पत्नी विद्या हिला मूलबाळ हवे असल्याने व ते होत नसल्यामुळेच नंदिनीचे अपहरण केल्याचे समर्थन जो शिवदास सातपुते करीत आहे, तत्पूर्वी त्याचा विवाह झालेला असून, त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले असल्याने व तेही सिडकोत अश्विन सेक्टरला सुखरूप असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच ‘स्पा’ (मसाज पार्लर)मध्ये जाण्याच्या त्याच्या सवयीतूनच सातपुतेची विद्याशी ओळख झाली व पुढे त्यांच्या संबंधात नाजुकता निर्माण झाल्याचे या व्यवसायाशी निगडित असलेल्यांचे म्हणणे आहे. अशाच महात्मानगर येथील एका ‘स्पा’च्या व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीवरून पंचवटीतील ओमकारनगरमध्ये राहणारा विनोद आव्हाड (२८) या तरुणाचे १७ डिसेंबर २०१३ रोजी रात्री अपहरण करण्यात आले. या प्रकरणी विनोद आव्हाड याच्या पत्नीने पंचवटी पोलिसांत अगोदर विनोदच्या बेपत्ता झाल्याची खबर दिली, त्यावरून पोलिसांनी तपास केला असता, बेपत्ता विनोदच्या भ्रमणध्वनीवरून वारंवार ज्या क्रमांकावर संभाषण करण्यात आले, त्यात शिवदास सातपुते, स्वाती बडगुजर, पराग सूर्यवंशी व अर्जुन ठाकूर या चौघांचा समावेश होता. त्यातही सातपुते याच्याशी विनोदचा आर्थिक व्यवहार असल्यामुळे त्यानेच घातपात करण्याच्या उद्देशाने विनोदचे अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने पोलिसांत दिल्यानंतर सातपुतेसह चौघांना अटक करण्यात आली. काही दिवसांनी ते जामिनावर मुक्त झाले; परंतु दोन वर्षे उलटूनही विनोदचा अद्याप शोध लागलेला नाही. या गुन्ह्यातून सातपुतेची निर्दोष सुटका झालेली नाही. मात्र ज्याचे अपहरण करण्यात आले तो विनोद आव्हाड याच्या पत्नीचेही शहरातील मध्यवस्तीत ‘स्पा’ होते व तेथेच विनोद व सातपुते या दोघांची गट्टी जमली होती हे विशेष.
विनोदच्या अपहरण प्रकरणात न्यायालयातून जामिनावर सुटलेल्या सातपुते व त्याच्या चिडलेल्या सहकाऱ्यांनी नंतर विनोदच्या पत्नीचे ‘स्पा’ बंद पाडण्यासाठी नको त्या खटाटोपी केल्या व विशेष म्हणजे त्यांच्या या कृत्यात पोलिसांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याने अखेर सौ. आव्हाड यांना मध्यवस्तीतील ‘स्पा’ बंद करावे लागले, कालांतराने तेथून जवळच विद्या सातपुते ऊर्फ विद्या पताडे (पाटील) यांनी ‘स्पा’ सुरू केले व त्यानंतरच शिवदास सातपुते व विद्या पताडे यांचे सूत जमले. याचाच अर्थ ‘स्पा’ व्यवसायाच्या भोवतीच या साऱ्या घटना-घडामोडी वेगाने घडल्या असून, या व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेतून गुन्हेगारीला उत्तेजन मिळत आहे. अशा व्यवसायाशी संंबंध ठेवणाऱ्यांकडून चार वर्षीय बालिकेचे अपहरण व्हावे व त्याचे मातृत्वाच्या गोंडस नावाने समर्थन करण्याची बाब खटकणारी आहे.