हॉटेलमधील मोफत प्रसाधनगृहांना मिळेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:28 IST2017-10-24T00:28:17+5:302017-10-24T00:28:24+5:30
शहरातील हॉटेल्समधील प्रसाधनगृहे मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा महापालिकेने केली असली तरी अद्याप कोठेही अशाप्रकारचे फलक लावण्यात आल्याचे आढळले नसून त्यामुळे महापालिकेच्या उत्साही प्रयोगाचे संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हॉटेलमधील मोफत प्रसाधनगृहांना मिळेना मुहूर्त
नाशिक : शहरातील हॉटेल्समधील प्रसाधनगृहे मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा महापालिकेने केली असली तरी अद्याप कोठेही अशाप्रकारचे फलक लावण्यात आल्याचे आढळले नसून त्यामुळे महापालिकेच्या उत्साही प्रयोगाचे संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात अपुरी प्रसाधनगृहे असल्याने नागरिकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. महापालिकेने नवीन प्रसाधनगृहे बांधण्याची तयारी केली, परंतु त्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासन हतबलता व्यक्त करीत आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने खासगी हॉटेल व्यावसायिकांनाच मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांनी हॉटेलबाहेर महिलांसाठी मोफत प्रसाधनगृहाचे फलक लावण्याचे ठरविण्यात आले. नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली.
त्यानुसार शहरातील अनेक हॉटेल्समध्ये फलक लावण्यात येणार होते. हैदराबाद आणि दिल्लीनंतर प्रथमच नाशिक
महापालिकेने अशाप्रकारचे फलक लावल्याचा गवगवा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र अशाप्रकारे कोणतेही फलक लावल्याचे आढळत नाही. महापालिकेनेदेखील अशा हॉटेल्सची नावे जाहीर केली नसून त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कायद्यात तरतूद
मुळातच हा प्रयोग महापालिकेने प्रथमच केल्याचा आव आणला. .हॉटेल व्यावसायिकांसाठीच्या कायद्यात तशी तरतूद आहे. सराय अॅक्टनुसार जेथे रक्कम देऊन पांथस्थ वास्तव्याला राहतात, त्याठिकाणी कोणत्याही व्यक्तीने म्हणजे केवळ महिला नव्हे तर कोणीही व्यक्ती आली तर त्यांना व त्यांच्याकडील पाळीव प्राण्याला पिण्याच्या पाण्याची सोय करणे तसेच त्यांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचीच तरतूद आहे. ती न केल्यास महापालिका कारवाई करू शकते. परंतु ते सोडून महापालिकेने आवाहन केले आणि त्यालाही अद्याप हॉटेलचालकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने आता या सर्व प्रयोगाच्या यशस्वीतेचा शोध घेण्याची गरज निर्माण आली आहे.