‘टिप्पर’ला आर्थिक मदत; ठेकेदाराला तुरुंगवास
By Admin | Updated: July 29, 2016 01:23 IST2016-07-29T01:22:40+5:302016-07-29T01:23:26+5:30
ठाणे येथून अटक : अतुल झेंडे यांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या

‘टिप्पर’ला आर्थिक मदत; ठेकेदाराला तुरुंगवास
नाशिक : सिडकोमध्ये दहशत माजविणाऱ्या ‘टिप्पर’गॅँगच्या मोक्क्यामधील गुन्हेगारांना आर्थिक रसद पुरविणारा शासकीय ठेकेदार स्वप्नील हेमंत गोसावी यास सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी ठाणेमधून गुरुवारी मध्यरात्री अटक केली. त्यास गुरुवारी (दि.२८) जिल्हा न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोक्का) न्यायालयीन कोठडीत असलेल्या टिप्परच्या दहा संशयितांना गोसावी हा वेळोवेळी आर्थिक मदत करत असल्याचा पोलिसांना संशय होता. तपासी अधिकारी सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी पोलीस पथकासह ठाणेमधून मध्यरात्री गोसावीच्या मुसक्या आवळल्या. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली गोसावीला पोलिसांनी अटक केली. त्यास सकाळी न्यायालयासमोर हजर केले असता मोक्का न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी येत्या पाच आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाकडून अॅड. अजय मिसर यांनी कामकाज पाहिले, तर गोसावी याच्याकडून अॅड. अक्षय कलंत्री व दीपक ढिकले यांनी युक्तिवाद केला.
टिप्पर गॅँग, परदेशी गॅँगसारख्या टोळ्यांशी संबंध ठेवणाऱ्या छुप्या गुन्हेगारांचा पोलीस शहरात व शहराबाहेरही शोध घेत आहेत. याअंतर्गत सहायक आयुक्त चव्हाण यांनी अजय बागुल यास मोक्काखाली अटक केली, तर दुसरीकडे झेंडे यांनी शासकीय ठेकेदार गोसावीच्या मुसक्या आवळल्या. एकू णच छुप्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी बडगा उगारला असून, भूमिगत गुन्हेगारांचा शोध घेत शहरात वाढलेल्या गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून फेकली जात आहे. (प्रतिनिधी)