...अखेर वासननगरच्या पाणीपुरवठ्याची वेळ बदलली
By Admin | Updated: October 18, 2015 22:08 IST2015-10-18T22:07:42+5:302015-10-18T22:08:11+5:30
तक्रारीची दखल : आता सकाळी येणार पाणी

...अखेर वासननगरच्या पाणीपुरवठ्याची वेळ बदलली
पाथर्डी फाटा : गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर भागात रात्री दहा ते बारा या वेळेत पाणीपुरवठा केला जात असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जाऊ लागल्या. मनपा प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी १२ वाजेची केली आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, तसेच रात्री-बेरात्री पाणीपुरवठा केला जात असल्याने बऱ्याचशा नागरिकांना पिण्याचे पाणीदेखील मिळत नसे. त्यामुळे कित्येकदा महिलांनी रात्रीच्या वेळेस रस्त्यावर ठिय्या देत आंदोलनेदेखील केलीत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी तथा मनपा अधिकाऱ्यांना निवेदने देऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आनंदनगर येथील विक्रीकर भवन येथे जलकुंभ उभारण्यात आला असून, येत्या काही दिवसांत कार्यान्वित केला जाणार आहे. तसेच पाथर्डी फाटा येथेही एक जलकुंभ उभारण्यात आला असून, तेथूनच लेखानगर तथा वासननगरला पाणीपुरवठा केला जात आहे. (वार्ताहर)