अखेर मान्सूनची हजेरी
By Admin | Updated: June 21, 2015 23:58 IST2015-06-21T23:46:07+5:302015-06-21T23:58:13+5:30
अंतिम चरणात बरसला मृग : जिल्ह्यात आतापर्यंत ८९८ मि.मी. पावसाची नोंद

अखेर मान्सूनची हजेरी
नाशिक : वेळेत दाखल होणार, अशी सूचना हवामान खात्याने दिल्यानंतर मान्सूनने तशी सलामी दिली खरी; परंतु त्यानंतर मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रतीक्षा करायला लावणाऱ्या वरुणराजाने मृगाच्या सरतेशेवटी आणि आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला शहरात सलामी दिली.
दुपारी अचानक भरून आलेल्या कृष्णमेघांनी सायंकाळी ५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. एक आठवड्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाने शहर परिसरात दुर्लक्ष केले होते. दररोज केवळ मेघ दर्शन देऊनच निघून जात असल्याने आजही तसेच काही घडेल, या अपेक्षेने नागरिकांनी पावसापासून संरक्षण करणाऱ्या वस्तू बरोबर न घेताच सायंकाळी घराबाहेर पाय टाकला; परंतु अचानक झालेल्या या पावसाने त्यांची धावपळ उडाली आणि रस्त्यात आसरा शोधावा लागला. रविवार असल्याने घराबाहेर पडलेल्या अनेकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून केवळ ढग दाटून येतात, पण पावसाचा थेंबही पडत नसल्याने तपमानातील उष्मा कायम होता; परंतु आज झालेल्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर पाऊस झाल्याने रस्त्यांनीही त्यांचे मूळ रूप दाखवले. रविवार असल्याने कामगार आणि विद्यार्थी वर्ग मात्र त्यातून बचावला. (प्रतिनिधी)