...अखेर चिमुकल्यांना मिळाली इमारत
By Admin | Updated: December 7, 2015 23:16 IST2015-12-07T23:15:45+5:302015-12-07T23:16:12+5:30
दिरंगाई : निकृष्ट कामामुळे दोन वर्षांपासून रखडले होते अंगणवाडीचे लोकार्पण

...अखेर चिमुकल्यांना मिळाली इमारत
वडझिरे : दोन वर्षांपूर्वी अंगणवाडीची इमारत बांधून पूर्ण झाली खरी; मात्र निकृष्ट कामे असल्याने ग्रामस्थांनी तिच्या लोकार्पणास आक्षेप घेतला होता. त्यामुळे दोन वर्षांपासून सदर इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती.
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नव्याने आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने दुरुस्ती करून घेत अंगणवाडीचे लोकार्पण केले. लालफितीत अडकून पडलेल्या अंगणवाडीच्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर त्यात चिमुकल्यांचा किलकिलाट ऐकू येऊ लागला आहे.
पोषण आहार योजनेअंतर्गत सन २०१३-१४ साली सुमारे ६ लाख रुपयांच्या निधीतून अंगणवाडीची इमारत बांधण्यात आली होती. मात्र फरशी, खिडक्या व स्वयंपाकगृह यांचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप तात्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे जुन्या ग्रामपंचायत इमारतीत अंगणवाडी भरवली जात होती.
तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया पार पडली. नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन अंगणवाडी इमारतीचे अपूर्ण व निकृष्ट काम पुन्हा नव्याने करून घेण्याची विनंती केली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून फरशी, खिडकी व स्वयंपाकगृहाची दुरुस्ती करून घेऊन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
सरपंच संजय नागरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव दराडे यांच्या हस्ते अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी भीमराव दराडे, संजय नागरे, अर्जुन बोडके, छाया नागरे, मंदा ठोंबरे, रामदास बोडके, कांतीलाल सानप, रामचंद्र कापसे, फकीरा दराडे, तुळशीराम ठोंबरे, बाळू बोडके, गोरख ठोंबरे, संजय बोडके आदिंसह ग्रामस्थ.