अखेर बहीण-भावाची झाली भेट..
By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:18+5:302016-08-18T23:34:18+5:30
रक्षाबंधन : रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने अनोखे ‘गिफ्ट ’

अखेर बहीण-भावाची झाली भेट..
इगतपुरी : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधण्याकरिता वडिलांनी मायाला सायंकाळी रेल्वेत बसवून दिले. परंतु, इगतपुरी रेल्वेस्थानकात भावा-बहिणीची चुकामूक होऊन रात्र झाली तरी बहीण न आल्याने भाऊ वाट पाहून भाऊ आपल्या पाड्याकडे घरी निघून गेला. माया शाळा शिकलेली नसल्याने आणि त्यात रात्रीची वेळ त्यामुळे ती घाबरून गेली. परंतु रात्रीच्या लोहमार्ग पोलिसांना गस्तीच्या वेळी ती घाबरलेल्या स्थितीत आढळली आणि त्यांनी तिची चौकशी
करून तिला रक्षाबंधनाच्या दिवशी सुखरूप तिच्या भावाच्या
स्वाधीन केले. रक्षाबंधनाच्या दिवशीच बहीण सुखरूप घरी पोहोचल्याचे पाहून भावाच्याही चेहऱ्या आनंद दिसला.
इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथील शांताराम जाधव गावात कामधंदा नसल्यामुळे नाशिक येथे काही दिवसांपासून मोलमजुरीचे काम करतात. रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्याकरिता शांताराम जाधव यांनी १७ आॅगस्ट रोजी सायंकाळी माया शांताराम जाधव (१४) हिला नाशिकरोड रेल्वेस्थानकातून इगतपुरीला जाण्यासाठी सायंकाळी रेल्वेत बसवून दिले. गाडी रात्री उशिरा इगतपुरीत आली. मायाला घेण्यासाठी तिचा भाऊ श्रावण शांताराम जाधव इगतपुरी रेल्वेस्थानकात उभा होता. मात्र मायाची व श्रावणची चुकामूक झाल्याने रात्र झाली तरी बहीण न आल्याने श्रावण वाट पाहून पाहून वैतागून आपल्या पाड्याकडे घरी निघून गेला. माया भावाला शोधण्यासाठी रेल्वेस्थानकातील तीनही प्लॅटफार्मवर शोधू लागली.
मायाने कधीच शाळेत गेलेली नसल्याने तिला नीट बोलताही येत नाही. स्वताबद्दलची माहिती कोणाला द्यावी हे कळत नसल्यामुळे ती अधिकच गोंधळून गेली. त्यात स्टेशनवरील काही मुलेही तिच्या मागोमाग फिरत होती. रात्रीचे १० वाजले होते. त्याचवेळी लोहमार्ग पोलिसांना गस्तीच्या वेळी ती घाबरलेल्या स्थितीत दिसून आली. त्यांनी तिची सखोल चौकशी करून विचारपूस केल्यानंतर ती चिंचलेखैरे येथे भावाला राखी बांधण्यासाठी आल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोहमार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाने मायाला रात्रभर रेल्वेस्थानकातील प्रतीक्षालयात ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळीच चिंचलेखैरे या गावात रक्षाबंधनाच्या दिवशी सुखरूप तिच्या भावाकडे नेवून त्याच्या स्वाधीन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक हेमंत घरटे, पोलीस हवालदार माधव दासरे, सतीश खर्डे, सत्यसुधन त्रिपाठी, राजेंद्र राठोड, गोविंद दाभाडे यांच्या या कामगिरीमुळे रेल्वे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर).