...अखेर गढीचे रहिवासी स्थलांतरासाठी तयार
By Admin | Updated: August 10, 2014 02:24 IST2014-08-10T02:24:21+5:302014-08-10T02:24:40+5:30
...अखेर गढीचे रहिवासी स्थलांतरासाठी तयार

...अखेर गढीचे रहिवासी स्थलांतरासाठी तयार
नाशिक : जोपर्यंत जुन्या घरांच्या अस्तित्वाबाबत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत स्थलांतर होणार नाही, असा पवित्रा काझी गढीच्या रहिवाशांनी काही दिवसांपर्यंत घेतला होता; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या आधिकाऱ्यांना रहिवाशांची समजूत काढण्यास यश आले असून, अखेर गढीच्या रहिवाशांनी स्थलांतरास होकार दर्शविला आहे. दरम्यान, ७० ते ७५ कुटुंबांची तात्पुरती निवास व्यवस्था लगतच्या गाडगे महाराज धर्मशाळा महापालिकेची बंद पडलेली शाळा, दवाखान्यामध्ये करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून काझीची गढी ढासळत चालली आहे. आठवडाभरापूर्वीच गढीचा काही भाग पुन्हा ढासळल्याने मनपा प्रशासन व रहिवाशांची झोप उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा गढीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊन संरक्षक भिंत बांधण्याच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापत होते. महापौर अॅड. यतिन वाघ यांनी गढीवर भेट द्यावी व रहिवाशांना लेखी हमी द्यावी, या मागणीचा आग्रह करत येथील धोकेदायक कथड्यावर रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक विनायक खैरे, आमदार जयंत जाधव यांनी ठिय्या आंदोलन करत महापौरांचा निषेध केला होता; यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून पर्यायी जागेमध्ये रहिवाशांच्या स्थलांतर व निवासाची तयारी सुरू करण्यात आली आहे. गढीवरील सर्व रहिवासी हे मोलमजुरी करणारे असून, त्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था लगतच्या संत गाडगे महाराज धर्मशाळेत, मनपाच्या बंद पडलेल्या दवाखाना, शाळेमध्ये करण्याचे काम मनपाकडून केले जात आहे. येत्या दोन दिवसांमध्ये काठालगतच्या सर्व धोकेदायक घरांमधील कुटुंबांना पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिल महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)