...अखेर जनावरे सोडली पिकात
By Admin | Updated: September 5, 2015 22:06 IST2015-09-05T22:05:37+5:302015-09-05T22:06:10+5:30
...अखेर जनावरे सोडली पिकात

...अखेर जनावरे सोडली पिकात
सिन्नर : पावसाळा अंतिम चरणात आला तरी वरुणराजा न बरसल्याने खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. वीतभर वाढलेल्या व पाण्याअभावी करपून चालेल्या पिकाचा चारा होणेही शक्य नसल्याने पीक शेतात जळून जाण्यापेक्षा त्यात जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. वरुणराजाच्या अवकृपेमुळे बळीराजाला पावसाळ्यात दुष्काळाची अनुभूती येत आहे.
सिन्नर तालुका तसा अवर्षणग्रस्तच. त्यातल्या त्यात पूर्व भाग दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. नदी व पाण्याचा स्त्रोत नसल्याने पूर्व भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर कोरवडवाहू शेती करतो. पावसाळ्यात बाजरी व कडधान्ये अशी पीके घेतली जातात. चार वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. या खरिपाच्या पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. यावर्षी मृग नक्षत्रातील पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतात उतरून पडलेले पीक जळून करपून जात आहे.
पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेली बाजरी, मका, सोयाबीन व कडधान्याची पिके कोमजून गेली आहेत. आज ना उद्या पाऊस होईल व किमान खरिपाचे पीक येऊन जनावरांपुरता चारा होईल, ही बळीराजाची भोळी आशा मावळल्यात जमा आहे. त्यामुळे पिकांत जनावरांना चरण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मोलामहागाचे बियाणे पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढले, नातेवाइकांकडून हातउसणे पैसे घेतले. याशिवाय शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट वाया गेले आहे.
सध्या तालुक्यातील १९ गावे व १३८ वाड्या-वस्त्यांवर २८ टॅँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. दिवसेंदिवस ही परिस्थिती आणखी अवघड होत असल्याचे दिसून येत आहे. जनवारांच्या चाऱ्याची परिस्थिती अवघड झाली आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आहे तर उर्वरित काळ कसा जाईल, याची विवंचना बळीराजासह प्रशासनाला लागून राहिली आहे.