मराठा मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: September 22, 2016 00:24 IST2016-09-22T00:23:40+5:302016-09-22T00:24:03+5:30
चांदवड : लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे समाजबांधवांना आवाहन

मराठा मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात
चांदवड : नाशिक येथे आयोजित क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते एकवटले असून, उत्साहाचे वातावरण आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपसातील भेदभाव, वैर बाजूला ठेवून एकोप्याने मोर्चा बांधणी सुरू आहे. त्यात आजी-माजी आमदारांसह सर्वच पदाधिकारी एकत्र आल्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. काळखोडे येथील मारुती मंदिरात सभा घेण्यात आली. यावेळी डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी मोर्चाचा उद्देश समजून सांगितला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबविणे व महिलांच्या सुरक्षिता यांसह विविध मागण्यांसाठी येत्या शनिवारी (दि. २४) मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. हा मूक मोर्चा असल्याने मोर्चात कोणीही कोणत्याही प्रकारच्या घोषणा देऊ नये, मोर्चा शांततेत संपन्न करण्यासाठी उपस्थित समाजबांधवांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नाशिक शहर स्वच्छ ठेवणे, मोर्चात सहभागी महिला, लहान मुले व वृध्दांची तरुणांनी काळजी घ्यावी, असे आवाहन गायकवाड यांनी केले. तरुण दत्ता मोठाभाऊ शेळके यांनी नाशिक येथे जाण्यासाठी जेवढी वाहने लागतील याचा खर्च उचलण्याचे जाहीर केले. यावेळी शिरीष कोतवाल, उत्तम भालेराव, डॉ. आत्माराम कुंभार्डे, विलास ढोमसे, पंढरीनाथ खताळ, अनिल काळे, डॉ. राजेंद्र दवंडे, शांताराम ठाकरे, शहाजी भोकनळ, नितीन अहेर, जगदीश कोल्हे, महेश न्याहारकर, खंडेराव अहेर, संतोष जामदार, मारुती शेळके, दत्ता शेळके, विलास शेळके, कचेश्वर डुकरे, बळीराम शेळके, भूषण शेळके, गणेश शेळके, गोविंद शेळके, सचिन शिंदे, आदेश सोनवणे, गोकुळ शेळके आदिंसह समाजबांधव उपस्थित होते. निंबाळे, तळेगाव रोही, वडगावपंगु, कातरवाडी, साळसाणे, काळखोडे, वाकी खुर्द, वाकी बु।।, वाहेगावसाळ, पाटे, कोलटेक, न्हनावे, पाथरशेंबे, रेडगाव खुर्द, पन्हाळे, ंगंगावे आदि गावांना एकाच दिवशी सर्व पक्षीय नेत्यांनी भेटी देऊन नियोजन केले (वार्ताहर)
चांदवडला बंदचे आवाहन
तळेगाव रोही : नाशिक येथे काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासंदर्भात तळेगाव रोही येथे बैठक संपन्न झाली. बैठकीत मोर्चाच्या दिवशी चांदवड शहर व तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले. बैठकीत मोर्चाचे नियोजनासंदर्भात माहिती देण्यात आली. नाशिकला जाण्यासाठी सर्व समाजबांधवांनी व कार्यकर्त्यांनी चांदवड बाजार समितीत जमावे असे आवाहन करण्यात आले. मूक मोर्चा असल्याने मार्चात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, कोणीही घोषणाबाजी करू नये आपसात बोलू नये, याची काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली. शहरातून व तालुक्यातून जास्तीत जास्त समाज बांधव मोर्चात सामील होतील याबाबत नियोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. सयाजीरावगायकवाड, दत्तात्रय गांगुर्डे, डॉ. राजेंद्र दवंडे, संजय जाधव, अनिल काळे, पंकज गायकवाड आदिंसह सर्व डॉक्टर, वकील, सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चास उपस्थित राहण्याचे आवाहन
मालेगाव : नाशिक येथे शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चास तालुक्यातून मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बंडूकाका बच्छाव यांनी केले. दाभाडी जिल्हा परिषद गट व रावळगाव गट येथील दौऱ्यात प्रत्येक गावात जाऊन बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. कोपर्डी घटनेचा खटला जलद न्यायालयात चालवण्यात यावा व दोषींना फाशी देण्यात यावी, अॅट्रासिटी कायदा रद्द करावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काश्मीरमधील उरी येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व कोपर्डी प्रकरणात बळी ठरलेल्या मुलीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावागावांतील इतर समाजांनीदेखील निवेदन देऊन मोर्चास पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये दाभाडी येथील लाडशाखीय वाणी समाज, दशनाम गोसावी समाज विकास मंडळ, प्रभू विश्वकर्मा युवा संघ, संतसेना नाभिक समाज यांनीही मोर्चास लेखी निवेदनाद्वारे पाठिंबा दिल्याची माहिती बच्छाव यांनी दिली. दौऱ्यामध्ये शशिकांत निकम, पंचायत समिती सभापती भरत पवार, रामचंद्र हिरे, नवल मोरे, रवंींद्र पवार आदि उपस्थित होते.
शिवचरित्रकार नितीन डांगे यांचे
गुरुवारी धोंडगव्हाण येथे व्याख्यान
चांदवड : तालुक्यातील धोंडगव्हाण येथील शनिचौकात मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २२) सकाळी ९ वाजता शिवचरित्रकार नितीन पाटील डांगे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी नाशिक येथे येत्या शनिवारी (दि. २४) आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. मराठा समाजबांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.