एप्रिलमध्येच घरपट्टी भरा, मिळवा पाच टक्के सूटपालिकेची योजना
By Admin | Updated: March 24, 2015 00:09 IST2015-03-24T00:06:58+5:302015-03-24T00:09:12+5:30
मेमध्ये तीन, तर जूनमध्ये मिळणार दोन टक्के सूट

एप्रिलमध्येच घरपट्टी भरा, मिळवा पाच टक्के सूटपालिकेची योजना
नाशिक : महापालिकेने मालमत्ता कराच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल जमा होण्यासाठी मिळकतधारकांसाठी १ एप्रिल ते ३० जून या कालावधीसाठी सवलत योजना तयार केली असून, घरपट्टीचे बिल मिळो अथवा न मिळो एप्रिल महिन्यातच संपूर्ण वर्षाची घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांना बिलात पाच टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय मे महिन्यात बिल भरणाऱ्यांना ३ टक्के, तर जून महिन्यात बिल भरणाऱ्यांना २ टक्के सवलत दिली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी सर्वसाधारणपणे आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात मिळकतधारकांना घरपट्टी बिलांचे वाटप केले जाते. मुदतीत बिलाचा भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना महापालिकेमार्फत एक टक्का सूट दिली जात असते. महापालिकेकडून आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये घरपट्टीची बिले पाठविली जात असली तरी मिळकतधारकांकडून मार्चअखेरीस भरणा केला जातो. त्यात बऱ्याचशा मिळकतधारकांकडून वर्षानुवर्षे घरपट्टी भरली जात नाही. घरपट्टीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी महापालिकेने आता एप्रिल ते जून या कालावधीसाठी सवलत योजना तयार केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातही दोन्ही सहामाहीची आगावू रक्कम भरणाऱ्या मिळकतधारकांना सवलत देण्याची तरतूद आहे. त्याचाच आधार घेत आयुक्तांनी शासन निर्णय आणि महासभेच्या ठरावानुसार सवलत योजना तयार केली असून, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात बिलाची रक्कम भरणाऱ्या मिळकतधारकास पाच टक्के सूट मिळणार आहे. तसेच मे महिन्यात बिलाची रक्कम भरल्यास तीन टक्के, तर जून महिन्यात बिलाची रक्कम भरल्यास दोन टक्के सवलत दिली जाणार आहे. मिळकतधारकांना सर्वसाधारणपणे आपल्या घरपट्टीची रक्कम माहिती असते. त्यामुळे बिल मिळण्यापूर्वीच मिळकतधारकांनी थकबाकीसह घरपट्टीची रक्कम एप्रिल ते जून या कालावधीत भरल्यास त्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल. यापूर्वी सोलर हिटर वापर करणाऱ्यांना देण्यात आलेली सूट कायम राहणार असल्याचेही आयुक्त गेडाम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)