पाणीपुरवठा योजनेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By Admin | Updated: July 16, 2014 00:36 IST2014-07-14T22:18:30+5:302014-07-16T00:36:56+5:30

पाणीपुरवठा योजनेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

File a complaint against the defaulters under water supply scheme | पाणीपुरवठा योजनेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

पाणीपुरवठा योजनेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

घोटी : धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक साठा असतानाही केवळ पाणीपुरवठा समिती, तांत्रिक सल्लागार, अधिकारी आणि स्थानिक राजकारण यांच्यामुळे अनेक योजना अपूर्णावस्थेत आहेत. या योजना पूर्ण कराव्यात यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आलेत, मात्र या प्रयत्नाला अद्यापही यश आले नाही. या योजना मात्र ‘जैसे थे’च असल्याने योजना मंजूर झालेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे ही तालुक्याची शोकांतिका आहे. या योजना अपूर्ण राहण्यास कारणीभूत असलले संबधित अधिकारी, पाणीपुरवठा समिती यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश आमदार निर्मला गावित यांनी बैठकीत दिले.
तालुक्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना व विद्यमान पाणीपुरवठ्याची स्थिती याचा आढावा घेण्यासाठी आज खंबाळे येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार गावित यांच्यासह अर्थ व बांधकाम सभापती तथा पंचायत समितीच्या प्रभारी सभापती अलका जाधव, जिल्हा परिषद सदस्य बेबीताई माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, पंचायत समिती सदस्य लहानू हिंदोळे, तहसीलदार महेंद्र पवार गटविकास अधिकारी किरण कोवे, पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता आर. टी. चित्ते यांच्यासह कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष कचरू डुकरे, पांडुरंग शिंदे, संपतराव काळे, भरत आरोटे आदि उपस्थित होते. या बैठकीत आमदार गावित यांनी उपस्थित सरपंच, उपसरपंच यांच्या पाणीपुरवठ्याबाबतच्या व्यथा जाणून घेत पाणीपुरवठा योजनांची माहिती घेतली. यात तालुक्यातील उंबरकोण, धारगाव, बलायदुरी, आडवण, पिंपळगावमोर, निनावी अधरवड, दौंडत, देवळे, साकूर, सांजेगाव, मुकणे आदि गावांत पाणीपुरवठा योजना मंजूर करूनही ही कामे अपूर्ण राहिली असल्याची बाब उपस्थितांनी मांडली. या योजना स्थानिक राजकारण, तांत्रिक सल्लगार आणि अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे अपूर्ण राहिल्या असल्याची बाब स्पष्ट झाली. यावर आमदार गावित यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरीत या योजना तत्काळ पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत किंवा योजनेत अडसर ठरणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट केले. दरम्यान, यावेळी आमदार गावित यांनी मराठा आणि मुस्लीम समाजाला आदिवासी तालुक्यात आरक्षण मिळणे गरजेचे असून, परिणामी या मागणीसाठी आपण रस्त्यावर उतरू आणि जनआंदोलन करू असा इशारा दिला. (* वार्ताहर)

Web Title: File a complaint against the defaulters under water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.